दुचाकी चोरट्यांची टोळी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:49 AM2019-01-13T00:49:12+5:302019-01-13T00:49:37+5:30
शहरातील बाजारपेठेतून दुचाकी आणि पायी जाणाऱ्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढणा-या चोरट्यांच्या टोळीला इतवारा पोलिसांनी पकडले आहे़ अटक केलेल्या तिघांकडून चोरीच्या तीन दुचाकी व पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.
नांदेड : शहरातील बाजारपेठेतून दुचाकी आणि पायी जाणाऱ्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढणा-या चोरट्यांच्या टोळीला इतवारा पोलिसांनी पकडले आहे़ अटक केलेल्या तिघांकडून चोरीच्या तीन दुचाकी व पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. शनिवारी न्यायालयात हजर केले असता दोघांची रवानगी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
शहर व परिसरात मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरात दररोज दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत़ मुख्य बाजारपेठ आणि घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकी चोरटे लंपास करीत आहेत़ त्यामुळे नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.
इतवारा ठाण्याच्या हद्दीत काही चोरटे दडून बसल्याची माहिती इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती़ त्यांनी इतवारा डीबी व त्यांच्या विशेष पथकाला चोरट्यांच्या शोधासाठी पाठविले़ शुक्रवारी रात्री जुन्या नांदेड भागातून तीन चोरट्यांना पथकाने ताब्यात घेतले.
त्यात प्रशांत पुयड, पांड्या व अन्य एक अल्पवयीन आरोपीचा समावेश होता. आरोपींकडून तीन दुचाकी व पाच मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता पांड्या व प्रशांत पुयड या दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तर अल्पवयीन आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याची माहिती पोनि़ साहेबराव नरवाडे यांनी दिली. चौकशीअंती आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. चोरट्यांना जेरबंद करणाºया पथकात इतवारा डीबीचे पोउपनि नंदकिशोर सोळंके, पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकातील शंकर नलबे, महंमद गौस, केशव गुट्टे, कराळे, शिंदे आदींचा समावेश होता.