दोन महिलांनी लांबविली चार लाखांची रोकड, मुखेड बसस्थानकासमोरील घटना
By प्रसाद आर्वीकर | Published: March 22, 2024 07:01 PM2024-03-22T19:01:09+5:302024-03-22T19:01:44+5:30
बँक खात्यातून पैसे काढून त्यांनी एका बॅगमध्ये पैसे ठेवले. त्यानंतर ते दुचाकीने बस स्थानकासमोर आले.
- शेखर पाटील
मुखेड : येथील बसस्थानकासमोर थांबलेल्या एका व्यक्तीची चार लाख रुपये असलेली बॅग दोन महिलांनी हातोहात लांबविल्याची घटना २२ मार्च रोजी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास मुखेड शहरात घडली आहे.
तालुक्यातील बेरळी खू येथील ज्ञानोबा पोटफोडे हे शुक्रवारी मुखेड शहरातील भारतीय स्टेट बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी आले होते. सायंकाळी पावणेचार वाजण्याच्या सुमारास बँक खात्यातून पैसे काढून त्यांनी एका बॅगमध्ये पैसे ठेवले. त्यानंतर ते दुचाकीने बस स्थानकासमोर आले. त्या ठिकाणी एका दुकानासमोर थांबले असता दोन महिलांनी त्यांच्या जवळील बॅग हिसका देऊन पळविली.
बॅग घेऊन या दोन्ही महिला कारमधून मुखेड -जांब बू रस्त्याने पसार झाल्या. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मुखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद चव्हाण तपास करीत आहेत.