जरांगे पाटलांना ठाकरे गटाच्या खासदाराचा उघड पाठिंबा; म्हणाले, "शेवटपर्यंत त्यांच्यासोबत आहे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 02:07 PM2024-06-29T14:07:05+5:302024-06-29T14:07:44+5:30
हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन चालू आहे. प्रशासन मात्र याची दखल घेत नाही. सध्या प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. त्यांचा अजून सत्तेचा माज गेला नाही. - आष्टीकर
मविआमध्ये जागावाटपाबाबत बोलणी सुरु होणार आहेत. अशातच संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करावा असे म्हणत चर्चेला तोंड फोडले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने यावर नकार कळविला असून निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवू अशी भुमिका घेतली आहे. यातच आता ठाकरे गटात उमेदवारी मिळविण्यासाठी नेते प्रयत्न करू लागले आहेत. ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि ठाकरेंचा माजी खासदार सुभाष वानखेडे यांना तिकीट मिळू नये अशी मागणी केली आहे.
महाविकास आघाडीकडून प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेचे तिकीट मिळू नये, असे माझे मत असल्याचे आष्टीकर म्हणाले. तसेच ठाकरे गटाचे नेते माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी लोकसभेला पक्ष विरोधी काम केले आहे. त्यांना देखील विधानसभेचे तिकीट मिळणार नाही. ज्या दिवशी वानखेडे तिकीट मागतील तेव्हा त्यांची तक्रार पक्षाकडे करणार. पक्षविरोधी कारवाई केल्यानंतर उबाठा गटातून उमेदवारी मिळत नाही, हे लोकांना समजायला हवे, असे आष्टीकर म्हणाले.
हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन चालू आहे. प्रशासन मात्र याची दखल घेत नाही. सध्या प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. त्यांचा अजून सत्तेचा माज गेला नाही. शेतकऱ्यांना तो उतरवावा लागेल आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असा इशारा आष्टीकर यांनी दिला. या सरकारला दोनच महिने शिल्लक आहेत, काहीही घोषणा करायला काय हरकत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी अर्थसंकल्पावर दिली.
6 जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता संवाद रॅलीला सुरुवात होणार आहे. मी त्यांच्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबत आहे असे देखील आष्टीकर म्हणाले.