राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या संपकरी १०४७ कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:09 AM2018-05-12T00:09:10+5:302018-05-12T00:09:10+5:30
कामावर रुजू व्हा अन्यथा कार्यमुक्त करण्याचा इशाराही देण्यात आला आहे़ त्यामुळे आरोग्य कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली असून याबाबत शनिवारी निर्णय घेण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शासकीय सेवेत विनाशर्त समायोजन आणि समान काम समान वेतन या प्रमुख मागण्यांसाठी ८ मे पासून पुन्हा बेमुदत संप पुकारणाºया जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या १०४७ कर्मचा-यांना शासनाने ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे़ कामावर रुजू व्हा अन्यथा कार्यमुक्त करण्याचा इशाराही देण्यात आला आहे़ त्यामुळे आरोग्य कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली असून याबाबत शनिवारी निर्णय घेण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे़
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत गेल्या दहा वर्षांपासून विविध पदांवर कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील १ हजार ४७ कर्मचा-यांनी बुधवारपासून पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले होते़ यापूर्वीही कर्मचा-यांनी आंदोलन केले होते़ परंतु, त्यावेळी केवळ आश्वासनावर त्यांची बोळवण करण्यात आली होती़ २१ एप्रिल रोजी आरोग्यमंत्री दीपक सावंत, आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्रिसदस्यीय समिती स्थापन करुन दहा दिवसांच्या आत विषय निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते़ त्यामुळे कंत्राटी कर्मचा-यांनी आंदोलन स्थगित केले होते़ त्यानंतर सर्व कर्मचारी २३ एप्रिलपासून कार्यालयात रुजू झाले होते़ परंतु आरोग्य विभागाने अद्यापही कर्मचा-यांना दिलेले आश्वासन पाळले नाही़ आंदोलनाला स्थगिती देण्याचीही ७ मे रोजी मुदत संपली होती़ त्यामुळे कर्मचा-यांनी ८ मे पासून पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली़ ८ ते १४ मे दरम्यान कामबंद तर १४ मे पासून नाशिक ते मुंबई लाँगमार्च काढण्यात येणार होता़ दरम्यान, राज्यभरात संपामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाल्यामुळे शासनाने कठोर भूमिका घेतली आहे़ ४८ तासांच्या आत हे कर्मचारी कामावर रुजू न झाल्यास त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्यात यावे़ त्यांच्या जागी नवीन पदभरती करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत़
दरम्यान, आरोग्य कर्मचारी संघटनेचे जुनेद म्हणाले, ४८ तासांच्या अल्टीमेटचे आयुक्तांचे पत्र मिळाले आहे़ शुक्रवारी दिवसभर आंदोलन सुरु होते़ अल्टीमेटच्या विषयावर शनिवारी काय तो निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले़