उमरीत अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारी चार वाहने पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:15 AM2020-12-25T04:15:09+5:302020-12-25T04:15:09+5:30
उमरी : तालुक्यात विनापरवाना वाळूची अवैधपणे वाहतूक करणारे तीन हायवा व एक टिपर अशी चार वाहने महसूल ...
उमरी : तालुक्यात विनापरवाना वाळूची अवैधपणे वाहतूक करणारे तीन हायवा व एक टिपर अशी चार वाहने महसूल विभागाच्या पथकाने पकडून जप्त केली आहेत.
उमरी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून तराफाच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा करून सर्रास विक्री होत आहे. यातील अनेक तराफे जप्त करून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाळून टाकले . यातील प्रमुख वाळू माफियांना मोकळे सोडून बारा मजुरावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामुळे उमरी तालुक्यात अजूनही दिवसाढवळ्या वाळूची सर्रास अवैधपणे वाहतूक करून विक्री होत आहे. भोकर चे उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र खंदारे यांच्याकडे या भागाचा चार्ज आल्यानंतर वाळू माफियांवर जोरकसपणे कार्यवाही सुरू झाली आहे. जप्त करण्यात आलेल्या एका टिपरचे मालक कैलास पाटील हातणीकर यांनी १लाख ५५ हजार ८८० रुपयांचा दंड भरला असल्याची माहिती तहसीलदार माधव बोथीकर यांनी दिली. वाळूने भरलेले ३ हायवा ही वाहने सध्या तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त असून प्रत्येक वाहनांमध्ये पाच ब्रास वाळू भरलेली आहे . त्यांना प्रत्येकी ३ लाख ३९ हजार ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. एकच पावती दिवसभर वापरून वाळूचे सर्रासपणे वाहतूक करण्यात येते. गोदावरी नदीच्या परिसरात कुठे वाळूचा साठा नसतानाही साठा असल्याचे दाखविण्यात येते. अशा अनेक प्रकारच्या क्लुप्त्या दाखवून वाळू माफियांचा गोरखधंदा चालू आहे. वाहतूक पासचा वेळ संपलेला असतानाही सदरील वाहनाद्वारे वाळूची वाहतूक करण्यात येत होती. त्यामुळे महसूल पथकाने त्यांचे विरूद्ध कार्यवाही केल्याची माहिती तहसीलदार माधव बोथीकर यांनी दिली.