उमरीचे कृषी अधिकारीपद दोन वर्षांपासून रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:04 AM2018-07-11T01:04:27+5:302018-07-11T01:05:00+5:30
उमरी : येथील तालुका कृषी कार्यालयात गेल्या दोन वर्षांपासून तालुका कृषी अधिकारी हे पद रिक्त असल्याने विविध कामांसाठी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरी : येथील तालुका कृषी कार्यालयात गेल्या दोन वर्षांपासून तालुका कृषी अधिकारी हे पद रिक्त असल्याने विविध कामांसाठी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
शेती संपन्न असलेल्या उमरी येथील तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिका-याचे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. तालुक्यात अनेक शेतकरी नवनवीन शेती विषयक उपक्रम राबवून पुढे येत आहेत़ मात्र उमरी येथे कृषी अधिकारी नसल्याने त्यांना शासनाच्या नवीन उपक्रमांची व योजनांची पुरेशी माहिती मिळत नाही. आतापर्यंत बाहेरील तालुक्याच्या कृषी अधिका-यांना येथील तात्पुरता पदभार सोपविण्यात आला होता. आजवर त्यांच्याकडूनच उमरी तालुक्याचे काम करवून घेतल्या गेले. महिन्यातून एक-दोन वेळा उमरीला येऊन हे अधिकारी थातूरमातूर काम पाहत असत. उमरी तालुक्यातील शेतक-यांसाठी येणा-या विविध योजना तसेच कृषी कार्यालयाशी संबंधित कामेही वेळेवर होत नसत़ त्यामुळे शेतक-यांना सतत अडीच वर्षांपासून या गैरसोयींचा सामना करावा लागला. गेल्या अडीच महिन्यांपूर्वी हिंगोली येथून गरजे यांची उमरीला बदली झाल्याचे आदेश काढण्यात आले. तेव्हापासून गरजे हे अद्यापपावेतो उमरीला रुजू झाले नाहीत. उमरी तालुक्यात पीक विम्यासंदर्भात शेतक-यांच्या असंख्य तक्रारी आहेत. पीकविम्याच्या हप्त्यापोटी मोठ्या प्रमाणात रकमा भरूनही शेतक-यांना मात्र दोनशे ते अडीचशे रुपये असा अत्यंत तोकड्या स्वरूपात पीकविमा मिळाला़
याबाबत शेतक-यांनी उमरी कृषी कार्यालयात चौकशी केली़ मात्र येथे तालुक्याचा मुख्य अधिकारीच नसल्याने त्यांचा नाईलाज झाला. अशा विविध प्रकारच्या शेतक-यांच्या समस्या असून येथे पूर्णवेळ स्वतंत्र पदभार असलेला तालुका कृषी अधिकारी नियुक्त करणे अत्यंत गरजेचे आहे.
तालुक्यात १२ सज्जे असून दोन कृषी पर्यवेक्षक व एक मंडळ कृषी अधिकारी अशी पदे आहेत. तालुक्यात ६२ गावांतून येणारे शेतकरी आपल्या शेतीविषयक अनेक समस्या घेऊन येताना दिसतात. मात्र येथे तालुका कृषी अधिकारी नसल्याने आपले गा-हाणे सांगावे तरी कुणाला? अशी स्थिती झाली आहे.
---
बिलोलीतील पदे भरा, अन्यथा आंदोलन
बिलोली : येथील तालुका कृषी अधिकारी पद तब्बल सहा वर्षानंतर भरण्यात आले आहे. मात्र अद्यापही येथे बारा पदे रिक्त असून शेतक-यांना नेहमीच गैरसोयीचा सामना करावा लागतो.
तालुका कृषी अधिकारी पदी मुदखेड येथून विजय घुगे यांनी पदभार स्वीकारला. तालुका कृषी अधिकारी पदाचा कार्यभार मागील सहा वर्षांपासून प्रभारी तर कधी अतिरिक्त राहत आलेला आहे़ पर्यवेक्षकासह येथे १२ पदे रिक्त आहेत. पावसाळापूर्व पालिका विरोधी पक्षनेता अनुप अंकुशकर यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. सन २०१२ मध्ये कृषी अधिकारी जहूर खान यांची बदली झाल्यानंतर वर्ग २ चे पद सतत रिकामेच होते. प्रभारी पदामुळे सातत्याने कामे खोळंबत असत. तालुक्यातील २ पालिका व ७३ ग्रामपंचायतअंतर्गत ५० हजारांपेक्षा जास्त शेतकरी आहेत. सातत्याने पदे रिक्त असल्याने शेतक-यांच्या अडचणी येत आहेत. उर्वरीत रिक्त पदे भरावीत अन्यथा येत्या स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्यात येईल, असा इशारा अंकुशकर यांनी दिला. सध्या शेती हंगाम असून कृषी पदांची आवश्यकता आहे. प्रशासनाने रिक्त पदे भरुन शेतीची व शेतक-यांच्या अडचणी सोडवाव्यात. प्रमुख पदे नेहमीच रिक्त राहण्याचा सपाटा सुरु आहे.