अनधिकृत आरआरबीटी कपाशीची लागवड करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:08 AM2021-05-04T04:08:44+5:302021-05-04T04:08:44+5:30
जिल्ह्यात पाण्याची व्यवस्था असलेले शेतकरी मे महिन्यात बीटी कपाशीची लागवड करतात. यामुळे सध्या बाजारात परराज्यातून अनधिकृत मार्गाने आर.आर. बी.टी. ...
जिल्ह्यात पाण्याची व्यवस्था असलेले शेतकरी मे महिन्यात बीटी कपाशीची लागवड करतात. यामुळे सध्या बाजारात परराज्यातून अनधिकृत मार्गाने आर.आर. बी.टी. बियाणे विक्रीसाठी येण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर.आर.बी.टी. हे वाण लागवड करु नये या बीटी वाणाच्या वापरामुळे ग्लायफोसेट या तणनाशकाचा अनावश्यक वापर वाढेल. तसेच या तणनाशकाचा अतिवापरामुळे जैवविविधतेस बाधा येऊन जमीन आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ही बीटी कपाशी गुलाबी बोंड अळीला प्रतिकारक्षम नसल्याने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच या बियाणास उत्पादनासाठी अधिकृत मान्यता नसल्याने सदरील बियाणे पूर्णपणे अनधिकृतरित्या उत्पादित केले आहे. त्याच्या सत्यतेची तपासणी कोणत्याही शासकीय यंत्रणेमार्फत झाली नाही. असे अनधिकृत बियाणे बाळगल्यास संबंधितावर कापूस बियाणे अधिनियम २००९, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या तरतुदीनुसार पाच वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनधिकृतपणे छुप्या मार्गाने मिळणाऱ्या आर.आर.बी.टी.ची खरेदी करुन त्याची शेतात लागवड करु नये, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, आत्माचे प्रकल्प संचालक माधव सोनटक्के यांनी केले आहे.