जनआरोग्य योजनेत नांदेड जिल्ह्यात पावणेतीन लाख कुटुंब पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 01:15 AM2018-09-22T01:15:15+5:302018-09-22T01:15:28+5:30

आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा २३ सप्टेंबर रोजी प्रारंभ करण्यात येणार असून या योजनेत जिल्ह्यातील २ लाख ७७ हजार २६२ कुटुंब पात्र ठरली आहेत़

Under the Public Health Scheme, lakhs of family members will be eligible for Nanded district | जनआरोग्य योजनेत नांदेड जिल्ह्यात पावणेतीन लाख कुटुंब पात्र

जनआरोग्य योजनेत नांदेड जिल्ह्यात पावणेतीन लाख कुटुंब पात्र

Next
ठळक मुद्दे११२२ रोगांवर होणार उपचार, सध्या दोन रुग्णालये संलग्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा २३ सप्टेंबर रोजी प्रारंभ करण्यात येणार असून या योजनेत जिल्ह्यातील २ लाख ७७ हजार २६२ कुटुंब पात्र ठरली आहेत़ या योजनेअंतर्गत ११२२ रोगांवर उपचार करण्यात येणार आहेत़
केंद्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना असून नांदेड जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे योजनेला सुरुवात करण्यात येणार आहे़ आयुष्यमान भारत योजनेत पात्र लाभार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीचे, दारिद्र्य रेषेखालील, भूमिहीन, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे, एकाखोलीचे कच्चे घर असलेले कुटुंब, महिला कुटुंबप्रमुख, १६ ते ५९ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नाही, अशा कुटुंबांचा या योजनेत सहभाग आहे.
तर शहरी भागातील कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लंबर, गवंडी, वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, झाडू मारणारे/सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकल रिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, अटेंडट, हॉटेल वेटर, मेकॅनिक/वीजतंत्री, दुरुस्ती करणारे, धोबी आणि चौकीदार या वर्गीकरणातील कुटुंब या योजनेस पात्र आहेत. या कुटुंबाना दरवर्षी प्रतिकुटुंब आरोग्यासाठी पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण राहणार आहे.
या योजनेतंर्गत त्या कुटुंबांना ठरावीक आजारासाठी देशभरातील कोणत्याही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचार घेता येणार असून त्यासाठी लाभार्थी कुटुंबाना ई- कार्ड देण्यात येणार आहेत. यासाठी जी रुग्णालये संलग्न करण्यात येतील, त्या रुग्णालयातील आरोग्यमित्र हे ई-कार्ड देतील. सद्य:स्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी व उपजिल्हा रूग्णालय, मुखेड हे दोन रुग्णालय संलग्नित करण्यात येणार आहेत. तूर्त राज्यात सध्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य ही योजना कार्यान्वित आहे.आयुष्यमान भारत योजनेसोबतच ही योजना चालू राहणार आहे.
आयुष्यमान भारत योजनेत किरकोळ व मोठे आजार यांच्या उपचारांचा समावेश आहे, हे या योजनेचे वैशिष्टे आहे़ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्या झिने व कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. विलास सर्जे यांनी केले आहे.

Web Title: Under the Public Health Scheme, lakhs of family members will be eligible for Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.