मराठवाड्यात तीव्र दुष्काळातच रोजगार हमी योजनेची कासवगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 07:36 PM2019-01-25T19:36:56+5:302019-01-25T19:55:28+5:30
मराठवाड्यातील एका मोठ्या वर्गाची मदार रोहयो योजनेवर अवलंबून आहे़ मात्र मागील वर्षीच्या तूलनेत मराठवाड्यात रोहयोची कामे कमी झाल्याचे खुद्द या विभागाचा अहवालच सांगतो़
नांदेड : दुष्काळी परिस्थितीत सर्वसामान्यांच्या हाताला हक्काचे काम मिळवून देणाऱ्या रोजगार हमी योजनेने यंदा मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे दुष्काळातच कच खाल्ल्याचे चित्र आहे़ मराठवाड्यातील ४७ हून अधिक तालुके दुष्काळाचा सामना करीत असून, या भागातील लाखोंना रोजगाराची गरज असताना रोहयोची कामे मात्र मागील वर्षीच्या तुलनेत घटल्याचे दिसून येत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना दुष्काळी परिस्थितीत सर्वसामान्य आर्थिक दुर्बल घटकासाठी वरदान ठरलेली आहे. यामुळेच ही योजना देशपातळीवर राबविली जात आहे. यंदा राज्यातील अनेक भागात अत्यल्प पर्जन्यमान झाले़ पर्जन्यमानातील तूट, भूजलाची कमतरता यामुळे राज्यातील १५१ तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला़ यात मराठवाड्यातील स्थिती अधिकच गंभीर आहे़ आठ जिल्ह्यातील तब्बल ४७ तालुके दुष्काळाचा सामना करीत असून, पावसाच्या मोठ्या तुटीमुळे यंदा खरीप हंगामातील उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे़ या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील एका मोठ्या वर्गाची मदार रोहयो योजनेवर अवलंबून आहे़ मात्र मागील वर्षीच्या तूलनेत मराठवाड्यात रोहयोची कामे कमी झाल्याचे खुद्द या विभागाचा अहवालच सांगतो़
रोहयोच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात येतात़ सन २०१६-१७ मध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील रस्त्याची ९४४ कामे पूर्ण करण्यात आली होती़ त्या तूलनेत २०१७-१८ मध्ये ६७३ कामेच या योजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले़ मागील वर्षी याच योजनेतून ७ हजार ६४१ रस्त्याची कामे सुरु होती़ यंदा सुरु असलेल्या रस्ते कामांची संख्या ७ हजार २२५ एवढी आहे. अशीच स्थिती जलसंधारण व जलसंवर्धनाच्या कामांची दिसून येते़ २०१६-१७ मध्ये मराठवाड्यात ६ हजार ९९० जलसंवर्धनाची कामे पूर्ण करण्यात आली होती़ २०१७-१८ मध्ये ५ हजार ४१८ कामेच पूर्ण झाली़ मागील वर्षी चालू कामांची संख्या २२ हजार ९४३ एवढी होती़ २०१७-१८ मध्ये सुरु असलेली कामे अवघी २० हजार ८७१ एवढी आहेत़
दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात २०१७-१८ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे मोठ्याप्रमाणात दुष्काळ प्रतिबंधक कामे हाती घेण्यात येतील असे अपेक्षीत होते़ मात्र या कामातही मराठवाड्यात रोहयोची गतवर्षाच्या तूलनेत पीछेहाट झाल्याचेच चित्र आहे़ २०१६-१७ या वर्षात मराठवाड्यात ३ हजार ५९० दुष्काळ प्रतिबंधक कामे पूर्ण करण्यात आली होती़ २०१७-१८ मध्ये मात्र केवळ ९५३ दुष्काळ प्रतिबंधक कामे पूर्ण करण्यात आली़ २०१६-१७ मध्ये सुरू असलेल्या दुष्काळ प्रतिबंधक कामांची संख्या ६ हजार २९६ एवढी होती़ २०१७-१८ मध्ये मात्र यात वाढ झाली असून, या वर्षात १० हजार ८० कामे सुरु आहेत़
दुष्काळात कशी वाढली पूरनियंत्रणाची कामे?
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतून २०१६-१७ च्या तुलनेत १७-१८ मध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कामांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते़ मात्र, त्याचवेळी या योजनेतून पूरनियंत्रण विषयाची कामे मात्र वाढल्याचे या अहवालातील आकडेवारी सांगते. २०१६-१७ या वर्षात पूरनियंत्रणाची ३० कामे पूर्ण करण्यात आली़ तर १०५ कामे सुरु होती़ त्या तुलनेत २०१७-१८ मध्ये पूरनियंत्रणाची ५६ कामे पूर्ण करण्यात आली़, तर २६ कामे सुरु आहेत़