नांदेड शहरात भूमिगत वीजवाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:08 AM2018-07-09T01:08:14+5:302018-07-09T01:08:57+5:30
नांदेड महापालिका क्षेत्रात ४८ कि.मी. अंतरावर उच्चदाब व लघुदाब भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात येणार असून ४८ कि.मी. अंतरात या भूमिगत वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या कामाच्या पर्यवेक्षणासाठी महापालिकेला ४८ लाख रुपये महावितरणकडून प्राप्त होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड महापालिका क्षेत्रात ४८ कि.मी. अंतरावर उच्चदाब व लघुदाब भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात येणार असून ४८ कि.मी. अंतरात या भूमिगत वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या कामाच्या पर्यवेक्षणासाठी महापालिकेला ४८ लाख रुपये महावितरणकडून प्राप्त होणार आहेत.
शहरात आयपीडीएस योजनेखाली उच्चदाब व लघुदाब भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी महावितरणने महापालिकेकडे प्रारंभी प्रकल्प १२२ कि.मी. अंतरात काम करण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर हे अंतर ६२ कि.मी. आणि शेवटी ४८ कि.मी. अंतरावर निश्चित झाले. महापालिकेने प्रारंभी ६२ कि.मी.च्या कामासाठी महावितरणकडे ३३ कोटी रुपये अपेक्षित शुुल्क असल्याचे सांगितले होते. मात्र याबाबत राज्य शासनाने महापालिका, नगरपालिका क्षेत्रात भूमिगत वीज वाहिनी टाकण्यासाठी नागपूर महापालिका आणि महावितरण यांच्यात रोड दुरुस्तीबाबत झालेल्या सामंजस्य करारानुसार काम करण्याचे निर्देश संपूर्ण महापालिकेला दिले आहे.
त्या सामंजस्य करारानुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
त्यामुळे नांदेडमध्येही आता नागपूर सामंजस्य करारानुसारच महावितरण शहरामध्ये ४८ कि.मी. अंतरात भूमिगत उच्च व लघूदाब वीज वाहिन्या टाकणार आहे. या कामासाठी महापालिकेने परवानगी दिली असून पर्यवेक्षणासाठी महापालिकेने प्रति किलोमीटर १ लाख रुपये दर आकारणी केली आहे. त्यानुसार महावितरण आता नांदेड महापालिकेला पर्यवेक्षणासाठी ४८ लाख रुपये देणार आहे.
त्याचवेळी या भूमिगत वीज वाहिन्यासाठी खोदण्यात आलेले रस्ते दुरुस्तीचे काम महावितरणच करुन देणार आहे. हे काम आता कधी सुरू होईल, याकडे लक्ष लागले आहे.
---
महावितरण करणार रस्ता दुरुस्तीचे काम
शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी महाविरणकडूृन ४८ कि.मी. अंतरात खोदकाम केले जाणार आहे. मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्याचेही खोदकाम होणार असून आता पुन्हा एकदा रस्त्यांची दूरवस्था होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी महावितरणकडूनच दुरुस्तीचे काम करुन घेतले जाणार आहे. या कामाच्या दर्जा तपासणीचे कामही महावितरणकडूनच केले जाणार आहे. त्यामुळे नांदेड शहरात विकास कामांतर्गत झालेल्या रस्ते बांधणीच्या कामाला पुन्हा एकदा छेद बसणार आहे. भूमिगत वाहिनी टाकल्यानंतर दुरुस्तीचे कामे योग्यरित्या झाली तर चांगले आहे अन्यथा शहरातील रस्त्यांचे पुन्हा पहिले पाढे, अशीच परिस्थिती होणार आहे.