कमी वजनाच्या बालकांना मृत्यूचा फास; नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाच दिवसांत २७ बालकांचा मृत्यू
By शिवराज बिचेवार | Published: October 7, 2023 05:49 AM2023-10-07T05:49:24+5:302023-10-07T05:51:32+5:30
जन्मानंतर बहुतांश बालकांचे वजन कमी
शिवराज बिचेवार
नांदेड : नऊ महिन्यांच्या काळात चार वेळेस सोनोग्राफी करावी, असे जागतिक मानके सांगतात; परंतु, विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या अनेक नवजात बालकांच्या आईची नऊ महिन्यांत एक ते दोन वेळेसच सोनोग्राफी झाल्याचे आढळून आले. काहींनी तर नऊ महिन्यांत एकदाही सोनोग्राफी केली नव्हती. त्यामुळे प्रसूतीपूर्वीच पोटातील बाळाचे वजन किंवा व्यंग याबाबत ते अनभिज्ञ होते. परिणामी, जन्मानंतर यातील बहुतांश बालके ही अडीच किलोपेक्षाही कमी वजनाची भरली अन् मृत्यूने त्यांच्यावर फास आवळला. गेल्या पाच दिवसांत रुग्णालयात एकूण २७ बालकांची प्राणज्योत मालवली आहे.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिमसह शेजारील तेलंगणातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. या ठिकाणी प्रसूती कक्षात दिवसाला २५ हून अधिक प्रसूती होतात. त्यातही नॉर्मल डिलिव्हरींची संख्या अधिक असते; परंतु, गर्भधारणा झाल्यानंतर ग्रामीण भागात अनेक महिलांची सोनोग्राफीच केली जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
बालकांवर उपचार का जिकिरीचे?
रुग्णालयात प्रसूतीनंतर जन्माला आलेले बाळ हे कमी वजनाचे भरते.
या बालकांवर उपचार करणे जिकिरीचे होऊन बसते. कमी वजनामुळे त्यांच्या फुप्फुसाचा विकास होत नाही.
परिणामी, त्यांना श्वास घेण्यासही अडचण होते. याच कारणामुळे रुग्णालयात बहुतांश बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून भ्रष्टाचाराची साथ विभागाला लागली आहे. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची सीबीआयमार्फत चौकशी करा.
- उद्धव ठाकरे पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट)
अनेक बालके जन्मापासूनच अत्यवस्थ
जन्माच्या वेळी बाळाचे वजन अडीच ते चार किलो हे योग्य समजले जाते. त्यापेक्षा कमी वजनाची बालके अत्यवस्थ समजली जातात.
रुग्णालयात मरण पावलेली अनेक बालके ही अडीच किलोपेक्षा कमी वजनाची होती. नऊ महिने नऊ दिवस ही प्रसूतीसाठी योग्य वेळ असते; परंतु, अनेक महिलांची सातव्या किंवा आठव्या महिन्यातच प्रसूती होते.
आईच्या पोटात असताना त्यांना आहार आणि ऑक्सिजन मिळतो; परंतु, बाहेर पडताच त्याला श्वसनाचा त्रास होतो, अशी माहिती बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. किशोर राठोड यांनी दिली.