चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारांची फौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:54 AM2019-03-31T00:54:38+5:302019-03-31T00:56:20+5:30
देशाचे भवितव्य तरुणाईच्या हाती आहे़ तरुणांची ही शक्ती विधायक मार्गावर खर्च करण्यासाठी त्यांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे़ परंतु, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारांची फौज तयार होत आहे़ त्यामुळे पुढील काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट बनू शकतो अशी शंका वाटते़ स्वातंत्र्यलढ्यापासून देशात तरुणार्इंनी अनेक आंदोलने केली असून आजचा लढा हा देशाच्या स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे़ तरुणांसाठी वैचारिक स्वातंत्र्याचा लढा आहे, असे प्रतिपादन खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़
नांदेड : देशाचे भवितव्य तरुणाईच्या हाती आहे़ तरुणांची ही शक्ती विधायक मार्गावर खर्च करण्यासाठी त्यांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे़ परंतु, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारांची फौज तयार होत आहे़ त्यामुळे पुढील काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट बनू शकतो अशी शंका वाटते़ स्वातंत्र्यलढ्यापासून देशात तरुणार्इंनी अनेक आंदोलने केली असून आजचा लढा हा देशाच्या स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे़ तरुणांसाठी वैचारिक स्वातंत्र्याचा लढा आहे, असे प्रतिपादन खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते़ यावेळी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आ़डी़पी़सावंत, आ़अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, पप्पू कोंडेकर, विठ्ठल पावडे, मंगेश शिंदे, अभिजित हाळदेकर, बालाजी गाडे, अब्दुल गफार यांची उपस्थिती होती़ तरुणाईच्या उत्साहाने खचाखच भरलेल्या सभागृहात अशोकराव चव्हाण म्हणाले, राज्यात सर्वच विभागात जवळपास साडेसहा हजार किमीचा प्रवास करुन मी शेतकरी, महिला, मजूर यासह तरुणांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत़ देश घडविण्याचे काम तरुणाईला करावयाचे आहे़ त्यामुळे पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनीही संभ्रमात राहू नये़ मतदान करण्यापूर्वी वैचारिक स्पष्टता असणे गरजेचे आहे़ देश आणि राज्यात काय चालले याबाबत एकवाक्यता असली पाहिजे़ आपण निवडून येणाऱ्या उमेदवारालाच मतदान केले पाहिजे़ जेणेकरुन आपले मत वाया जाणार नाही़ देशात विद्यार्थ्यांची परिस्थिती वाईट आहे़ दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन देणाºया मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोट्यवधी बेरोजगार निर्माण झाले आहेत़ पाच वर्षांपूर्वीच्या जाहिराती काढून पाहिल्यास या सरकारने आपली किती फसगत केली हे लक्षात येईल़ परंतु लोकांची स्मरणशक्ती ही कमी असते़ त्यांना आज काय चालले, जे दाखविले जाते तेच खरे वाटते़ परंतु आता वातावरण बदलत आहे़ लोकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आहे़ त्यामुळे आता लोकच ‘अब की बार बस कर यार’ असे म्हणत आहेत़ तरुणांनी शिकून पकोडे तळावे असे भाजपाचे लोक म्हणत आहेत़ चांगली नोकरी मिळावी म्हणूनच पोटाला चिमटा घेत गरीब आई-वडील मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवितात़ परंतु, या असंवेदनशील सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही़
धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम सर्व समाजाला आरक्षणाचे आश्वासन देण्यात आले़ ५८ मोर्चे काढल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिले़ त्यावेळी एकमेकांना पेढे भरविणाऱ्यांनी नोकरीच्या वेळी मात्र मराठा समाजाच्या विरोधात आदेश काढून त्याचा लाभ मिळण्यापासून रोखले़ देशाचा जीडीपी ७ टक्के आहे, असे सांगितले जाते़ मग नोकºया का निर्माण होत नाहीत? असा प्रश्न तरुणांनी सरकारला विचारला पाहिजे़ रोजगारासाठी नांदेड एमआयडीसीमध्ये जागा नाही़ आम्ही आरक्षित केलेल्या जागेवरील आरक्षण उठवावे अशी मागणी सवंग लोकप्रियतेसाठी सत्ताधारी पक्षातील काहीजण करीत आहेत़
तरुणांच्या प्रश्नांचे चव्हाणांनी केले समाधान
- युवा संवाद कार्यक्रमात उपस्थित तरुणांनी यावेळी खा़अशोकराव चव्हाण यांच्यापुढे अनेक प्रश्न उपस्थित केले़ त्यामध्ये अल्पसंख्याक समाजावरील वाढते अत्याचार, बेरोजगारी, डी़एड़,बी़एड. विद्यार्थ्यांची समस्या, वैचारिक स्वातंत्र्यावर घाला, स्पर्धा परीक्षांची भरती, बारुळचा प्रकल्प यांचा त्यात समावेश होता़ या सर्व प्रश्नांची चव्हाण यांनी समाधानकारक उत्तरे देत तरुणांची मने जिंकली़ यावेळी तरुणांनीही टाळ्या अन् शिट्ट्या वाजवित त्यांना दाद दिली़
- पाच वर्षांत भाजपाने नांदेड जिल्ह्यात किती उद्योग आणलेत हा मोठा मुद्दा आहे़ केवळ भावनेला हात घालून मतं मागायची असाच उद्योग त्यांचा सुरु आहे़ नोटबंदी, जीएसटी यामध्ये कुणाचा फायदा झाला ? देशातील १०७ अर्थतज्ज्ञांनी मोदी सरकारने सादर केलेली सर्व आकडेवारी कशी चुकीची आहे हे उघड केले़ शेतकºयांनी मोर्चे काढले़ परंतु, त्यांना आधारभूत किंमत देण्यास हे सरकार अपयशी ठरले़ त्यामुळे या अपयशी सरकारला सत्तेतून घालविल्याशिवाय आपले सर्व प्रश्न सुटणार नाहीत, असेही चव्हाण म्हणाले़