हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:58 AM2019-03-04T00:58:16+5:302019-03-04T01:00:00+5:30
ज्या ठिकाणी कृषीपंपांचा लोड जास्त आहे, अशा ठिकाणच्या फीडरच्या सेपरेशनची कामे पूर्ण करावीत.
नांदेड : ज्या ठिकाणी कृषीपंपांचा लोड जास्त आहे, अशा ठिकाणच्या फीडरच्या सेपरेशनची कामे पूर्ण करावीत. लोड प्लानिंग करण्यासाठी ऐएमआर रिडींग महत्त्वाचे असल्याने सर्व वीजवाहिन्यांचे (फीडर) ऐएमआर रिडींग झालेच पाहिजे. याबाबतीत हलगर्जीपणा करणा-या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, सेवापुस्तिकेमध्ये त्याची नोंद घेतली जाईल, असा सज्जड इशारा महावितरणचे संचालक दिनेशचंद्र साबू यांनी दिला.
नांदेड परिमंडळाच्या सभागृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सुरु असलेल्या विविध योजनांच्या कामांचा साबू यांनी आढावा घेतला. या बैठकीस नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता डी.व्ही.पडळकर, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता काकाजी रामटेके, नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे, परभणी मंडळाचे अधीक्षक अभियंता दत्तात्रय बनसोडे, हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
भविष्यातील वाढती वीजग्राहक संख्या लक्षात घेता पायाभूत सुविधा भक्कम करण्याकरिता एकात्मिक ऊर्जाविकास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या उपकेंद्रांची व इतर महत्त्वाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता यांनी काम करणा-या एजन्सीसोबत समन्वय ठेवत मार्चपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यरत रहावे, असे निर्देश संचालक साबू यांनी दिले. त्याचबरोबर आपल्या कार्यक्षेत्रातील अपघात स्थळांचे सर्वेक्षण करुन आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण कराव्यात.
आपण विकलेल्या विजेचा महसूल वेळेवर प्राप्त होणे महत्त्वाचे असल्याने प्रत्येक अधिकारी- कर्मचारी यांनी जबाबदारीने काम करणे महत्त्वाचे आहे. वीजबिल दरमहा भरण्याची सवय ग्राहकाला लागावी यासाठी प्रामाणिकपणे काम करा तसेच वीजग्राहकांशी सौजन्य ठेवत अखंडित वीजसेवा द्यावी, असे आवाहनही साबू यांनी केले.