दुर्दैवी ! नाल्याच्या पाण्यात दोन महिला वाहून गेल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 06:26 PM2021-08-25T18:26:48+5:302021-08-25T18:27:04+5:30
शिवणी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे पाणी वाढले होते.
ईस्लापूर - मंगळवारी दुपारी ३ च्या दरम्यान शिवणी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. पावसामुळे नाल्याचे पाणी वाढून त्यात दोन महिला वाहून गेल्याची घटना घडली. प्रमिलाबाई लछन्ना तमलवाड (वय ५५), महअबी रज्जाक आगुवाड (वय ६०), अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमिलाबाई लछन्ना तमलवाड, महअबी रज्जाक आगुवाड या नेहमीप्रमाणे नाला पार करून शेतीची कामे करण्यासाठी दोघीही जात होत्या. यातच पाऊस सुरू झाल्याने नाल्याचे पाणी वाढले. रोजचे जाणेयेणे असल्याने दोघींनी पाण्यातून जाण्याच्या निर्णय घेतला. दोघी नाला पार करण्यासाठी पाण्यात उतरल्या. मात्र, यात दोघींही नाला पार करण्याच्या प्रयत्नात वाहून गेल्या. गावकऱ्यांनी दोघींनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांचे प्रयत्न कमी पडले. काही वेळानंतर दोघींचेही मृतदेह सापडले.