केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सचखंड गुरुद्वारात माथा टेकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 18:32 IST2021-09-17T18:27:27+5:302021-09-17T18:32:45+5:30
Amit Shah : सध्या धार्मिक स्थळे बंद असल्याने अमित शहा यांनी गुरुद्वाराच्या पायरीचे दर्शन घेतले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सचखंड गुरुद्वारात माथा टेकला
नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah ) यांनी नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात ( Sachkhand Gurudwara Nanded) माथा टेकला. गृहमंत्री अमित शहा नांदेड दौऱ्यावर आहेत. आज दुपारी मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रात त्यांनी सीआरपीएफच्या ( CRPF Camp ) वृक्षारोपण उपक्रमात १ कोटीव्या वृक्षाचे रोपण केले.
आज सकाळी ११ वाजता नांदेड विमानतळावर गृहमंत्री अमित शहा यांचे आगमन झाले. यानंतर हेलिकॉप्टरने ते मुदखेड येथिल केंद्रीय राखीव पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालयात पोहचले. येथे त्यांच्या हस्ते १ कोटीव्या वृक्षाचे रोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमानंतर तेलंगणातील एका कार्यक्रमासाठी रवाना झाले. तेलंगणातील कार्यक्रम आटोपून पुन्हा ते नांदेडला परतले. त्यानंतर त्यांनी नांदेड येथील सचखंड गुरुद्वारात माथा टेकला. सध्या धार्मिक स्थळे बंद असल्याने अमित शहा यांनी गुरुद्वाराच्या पायरीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि भाजपच्या इतर नेत्यांची उपस्थिती होती. गृहमंत्र्यांनी गुरुद्वारा बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने गृहमंत्री शहा यांचे प्रथेप्रमाणे स्वागत करण्यात आले.
हेही वाचा - ‘सीआरपीएफ’मुळेच देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत : अमित शहा
म्हणून नांदेडची निवड केली
केंद्रीय सुरक्षा बलाने २ काेटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. दाेन वर्षांपासून हा कार्यक्रम राबवला जात आहे. यावर्षी ९९ लाख ९९ हजार ९९९ रोपांची लागवड करण्यात आली असून, १ काेटीव्या क्रमांकाचे रोप मी मुदखेड येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये लावताेय, ही माझ्या आनंदाची व गाैरवाची बाब आहे. १७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा वाढदिवस, निजामाच्या जुलमी शासनातून मराठवाडा व तेलंगणाची मुक्तता झाल्याचा सुवर्ण दिवस व गुरू गाेविंदसिघांची पावन भूमी. त्यामुळेच मी नांदेड जिल्ह्याची १ काेटीव्या वृक्ष लागवडीसाठी निवड केल्याचे शहा यांनी सांगितले.