तणाव कमी करण्यासाठी पोलिसांकडून जोपासला जातोय अनोखा छंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:18 AM2021-05-11T04:18:24+5:302021-05-11T04:18:24+5:30
नांदेड जिल्ह्यात मागील मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कोरोना रूग्णांची संख्या वाढवली. मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत ...
नांदेड जिल्ह्यात मागील मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कोरोना रूग्णांची संख्या वाढवली. मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. त्यामुळे नागरिक भयभीत झाले. अशा भयावह वातावरणात माणसे चिंताग्रस्त झाली. त्याला पोलीस कर्मचारीही अपवाद राहिला नाही. सेवा बजावत असताना मनात होणारी उलघाल थांबत नव्हती. अशा वेळी अंगभूत असलेल्या कलेची साधना करून पोलीस कर्मचाऱ्यांनी पुन्हा आपल्यातील कलावंत जागा केलेला पाहण्यास मिळत आहे.
चौकट- तणावपूर्ण वातावरणात संगीतच माणसाला जगण्यासाठी प्रेरणा देते. गाण्याचा छंद लहानपणापासूनच लागला. गाणे ऐकत ऐकत गाणे म्हणायला शिकलो. त्यामुळे रिकाम्या वेळेत आजही आवडते, गाणे म्हणून स्वताला प्रसन्न ठेवतो. सध्या काळात माणसांना बळ देण्यासाठी संगीत हे एक प्रभावी माध्यम आहे. आजही मला वेळ मिळाला की मी गाणे म्हणतो.
-रवींद्र साखरकर,पोलीस कर्मचारी. नांदेड
चौकट- गाणे ऐकण्याचा छंद लहानपणापासूनच होता. त्यानंतर पोलीस विभागात सेवा बजावत असतानाही गाणे ऐकण्याचे व गायनाचा छंद कमी होऊ दिला नाही. मात्र पोलीस विभागात आल्यानंतर देशभक्तीपर गीते गायनाचा विशेष छंद लागला. अभंग गाण्याची ही विशेष आवड आहे. कोरोना काळात मला चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी ही कला कारणीभूत ठरली.
-रामराव देशमुख. अर्धापूर.
चौकट-कविता लेखन करणे हा माझा आवडता छंद आहे. कविता वाचनाची आवड लहानपणापासून होती. शालेय व महाविद्यालयीन जीवनापासून कविता लिहीत गेलो. सध्याच्या कठीण काळात कलेची साधना नक्कीच ऊर्जा देणारी बाब आहे. कोरोना काळात अनेक तणावपूर्ण प्रसंगांतून पोलिसांना जावे लागत आहे. अशा वेळी मी माझ्यातला कवी समोर करून जगतो.
- डी.एन.मोरे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नांदेड.