शेतकऱ्यांना सुखी, समृद्ध करण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन करावे : नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 12:38 PM2023-02-25T12:38:51+5:302023-02-25T13:26:42+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांना डी. लिट प्रदान
नांदेड : देशात रस्ते, महामार्गाचे जाळे निर्माण होत आहे. त्यांचा उपयोग करून शेतकऱ्यांना सुखी, समृद्ध करण्यासाठी विद्यापीठांनी काही मूलभूत कामे तसेच संशोधन करून मार्ग काढावा. कारण शेतकरी, विद्यार्थी आणि महिला या तीन घटकांच्या उत्थानावरच समाजाचे कल्याण अवलंबून असते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २५वा दीक्षांत समारंभ दि. २४ फेब्रुवारीला विद्यापीठात थाटात पार पडला. यावेळी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती, राज्यपाल रमेश बैस, तर प्रमुख पाहुणे म्हणून होमी भाभा राष्ट्रीय संस्था अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांची आभासी उपस्थिती होती. यावेळी विद्यापीठाच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांना डी.लिट प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना गडकरी यांनी, देशाचे भविष्य हे युवकांच्या हाती असून, त्यांनी चांगले गुण मिळविण्यासोबतच चांगले नागरिक होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी नोकरी मिळविण्यापेक्षा नोकरी देणारे झाले पाहिजे. या देशातील आजही अनेक नागरिकांना घर नाही, अन्न नाही. अशा लोकांच्या जीवनात तुम्ही प्रकाश बनून आले पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज बदल कसा होइल, हा विचार केला पाहिजे. शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, यासाठी संशोधन केले पाहिजे. तुमचे ज्ञान हे समाजासाठी उपयोगी आले पाहिजे.
माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम म्हणाले, शिक्षणाने बौद्धिक स्वावलंबन व आर्थिक स्वावलंबन निर्माण झाले पाहिजे. शिक्षण म्हणजे केवळ पदवीचा कागद नाही. शिक्षण म्हणजे संस्कार. तुमचा आचार, विचार व समाजातील व्यवहार हा संस्कारातून प्रकट होतो. तुमचे शिक्षण तुमच्या व्यक्तिमत्त्वातून प्रकट होते. जागतिकीकरणाच्या लाटेत कौशल्ये तरुणांना आत्मसात करता यावीत, यासाठी पोषक वातावरणनिर्मिती करणे मोठे आव्हान आहे. विद्यापीठाचा उद्देश ज्ञानाची निर्मिती आणि संवर्धन करून त्याचा उपयोग मानवी समाजाच्या विकासासाठी करणे हा आहे.
डॉ. अनिल काकोडकर हे आभासी भाषणात म्हणाले, विद्यापीठात समाजाचे प्रतिबिंब व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शनाची सोय निर्माण झाली पाहिजे. अशाप्रकारे ज्ञानाधिष्ठित शाश्वत मानव विकास व पर्यावरण संवर्धन साधताना त्यातून कोणत्याही प्रकारचे शोषण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. जागतिक स्पर्धेत पुढे येत असताना देशातील विषमता नष्ट करणे हीसुद्धा आपली प्राथमिकता असावी. करिअरच्या वाटा वेगवेगळ्या असल्या तरी उच्चशिक्षणाचा उपयोग राष्ट्रविकासासाठी करावा, असे आवाहन केले.
स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी प्रास्ताविक व विद्यापीठ अहवाल सादर केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन डॉ. पृथ्वीराज तौर यांनी तर माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी केले. या सोहळ्यास प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा मूल्यमापन व नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. योगिनी सातारकर, डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले.