विद्यापीठ नावारुपाला आणल्याचे समाधान; निवृत्तीनंतर लेखन, संशोधनात रमणार : पंडीत विद्यासागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 06:18 PM2018-08-31T18:18:57+5:302018-08-31T18:20:55+5:30
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त करुन देण्यात यश लाभले. स्थापनेनंतर अवघ्या २० वर्षाच्या कालावधीत हा दर्जा प्राप्त करणारे राज्यातील हे पहिलेच विद्यापीठ ठरले.
- विशाल सोनटक्के
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त करुन देण्यात यश लाभले. स्थापनेनंतर अवघ्या २० वर्षाच्या कालावधीत हा दर्जा प्राप्त करणारे राज्यातील हे पहिलेच विद्यापीठ ठरले. या माध्यमातून हे विद्यापीठ इतर विद्यापीठाच्या बरोबरीत आणल्याचे समाधान आहे, अशा भावना मावळते कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केल्या. निवृत्तीनंतर पुण्यामध्ये संशोधन, लेखनात रमणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पदभार हाती घेतल्यानंतर अनेक आव्हाने होती. मात्र विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात भरीव योगदानास सुरुवात केली आहे. केंद्र सरकार शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांना राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाद्वारे अर्थसहाय्य करीत आहे. यासाठी नॅकचा ‘अ’ दर्जा असण्याची अट आहे. स्वारातीम विद्यापीठ या अर्थसहाय्यासाठी पात्र ठरल्याने विद्यापीठाला भरीव सहाय्य मिळत आहे. ग्रंथालयाने आता पीएच.डीचे सर्व प्रबंध डिजीटल उपलब्ध करुन दिले आहेत. संशोधनामध्येही विद्यापीठ चांगली कामगिरी करीत आहे. नुकतेच विद्यापीठाने मुतखड्यावरील प्रभावी औषध बाजारपेठेत आणले आहे. या औषधाला केंद्र शासनाचे पेटंटही मिळाले आहे.
या संशोधनासाठी अनुदान देणाऱ्या रूसाच्या दुसऱ्या टप्प्यात १० कोटी प्राप्त झाले आहे. त्यामध्ये सोलार एनर्जी प्रकल्प उभारण्यात येईल. याबरोबरच पुढील दहा वर्षासाठी विद्यापीठाने ८५४ कोटी रुपयांची मागणी केली आहे. हा निधी मिळाल्यास पूर्ण क्षमतेने नांदेडचे विद्यापीठ विकसित झालेले दिसेल, असा विश्वासही डॉ. पंडीत यांनी व्यक्त केला.
आॅनलाईन प्रश्नपत्रिकांची योजना राबविणारे पहिलेच विद्यापीठ
विद्यापीठाच्यावतीने परीक्षा घेणे, त्यासाठी नियोजन करणे हा महत्वाचा भाग असतो. या परीक्षेसाठी धाडसाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आणि प्रश्नपत्रिका आॅनलाईन पाठविण्याची योजना कार्यान्वित केली. या उपक्रमामुळे प्रश्नपत्रिका छापणे आणि वितरीत करणे याचा लाखोंचा खर्च वाचला. विद्यापीठातील सर्व विषयांसाठी ही योजना राबविणारे स्वारातीम हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ असल्याचेही विद्यासागर यांनी आवर्जून नमुद केले.
डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे विद्यापीठाचा प्रभार
कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर शुक्रवार ३१ आॅगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे नवीन कुलगुरू येईपर्यंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पदभार आयुर्वेदिक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. डॉ. म्हैसेकर हे मुळचे नांदेड येथीलच असून नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक, अधिष्ठाता आदी पदावर त्यांनी सुमारे २५ वर्षाहून अधिक काळ काम केलेले आहे. या संदर्भात डॉ. म्हैसेकर यांच्याशी संपर्क साधला असता शुक्रवारीच आपण पदभार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.