बाराहाळीच्या सरपंचपदी अंजलीताई देशपांडे, तर उपसरपंचपदी व्यंकट वळगे यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:16 AM2021-02-14T04:16:52+5:302021-02-14T04:16:52+5:30
सामाजिक व राजकीयदृष्ट्या नेहमीच बाराहाळी हे गाव मुखेड तालुक्यात केंद्रस्थानी असते. ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होताच बाराहाळी येथील ग्रामपंचायत निवडणूक ...
सामाजिक व राजकीयदृष्ट्या नेहमीच बाराहाळी हे गाव मुखेड तालुक्यात केंद्रस्थानी असते. ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होताच बाराहाळी येथील ग्रामपंचायत निवडणूक तालुक्यातील पुढार्यांसाठी चर्चेचा विषय ठरली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बाराहाळीत नेहमीच देशमुख व देशपांडे गटांमध्ये थेट निवडणुकीचा फड रंगत असे; पण यावर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रथमच तिरंगी लढत बाराहाळीत रंगली. त्यामुळे मुखेड तालुक्यात सर्वाधिक चर्चा बाराहाळी ग्रामपंचायत निवडणुकीविषयी घडून आली. या झालेल्या तिरंगी लढतीमध्ये देशपांडे गटाने निर्विवाद वर्चस्व प्राप्त करीत १५ ग्रामपंचायत सदस्यांपैकी १० सदस्य निवडून आणून एक हाती सत्ता काबीज केली.
शनिवारी झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागले असताना सरपंचपदी अंजली देशपांडे यांची, तर उपसरपंचपदी व्यंकट वळगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून नायब तहसीलदार महेश खांडे, तलाठी अजय सिंग ठाकूर व ग्राम विकास अधिकारी सतीश गायकवाड हे उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा शपथविधी व नागरी सत्कारांचा कार्यक्रम भाऊसाहेब देशपांडे मंगल कार्यालय येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजया देशपांडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष देशमुख, सुनील देशमुख, बाळकृष्ण देशपांडे, मल्हार देशपांडे, वडगावकर गुरुजी, अरुण महाजन, विश्वनाथ पाटील जाधव, कमलकिशोर देशमुख वामनरा देशपांडे, पत्रे गुरुजी, डॉ. संजय गाढवे डॉ. शिवपुजे, आदी उपस्थित होते. राजन देशपांडे यांनी प्रास्ताविक केले, तर गणेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले.