रेल्वेत बिनधास्त धूम्रपान; महिनाभरात १०० जणांवर गुन्हे दाखल
By प्रसाद आर्वीकर | Published: November 18, 2023 03:32 PM2023-11-18T15:32:27+5:302023-11-18T15:33:07+5:30
विविध रेल्वे गाड्यांमध्ये १५६५ तपासण्या केल्या असून, रेल्वेत धूम्रपान करणाऱ्या १०० जणांवर गुन्हे दाखल
नांदेड : रेल्वेतून ज्वलनशील पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी दमरेच्या नांदेड विभागाने एक महिन्याचे जनजागृती आणि तपासणी अभियान राबविले. त्यात विविध रेल्वे गाड्यांमध्ये १५६५ तपासण्या केल्या असून, रेल्वेत धूम्रपान करणाऱ्या १०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी दिली.
रेल्वेत आणि रेल्वेच्या आवारात ज्वलनशील पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी नांदेड विभागाने १८ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत जनजागृती अभियान राबविले. विविध रेल्वेस्थानकांवर १२१० तपासण्या केल्या. त्याचप्रमाणे रेल्वे गाड्यांमध्ये १५६५ आणि यार्ड, वॉशिंग लाइन या भागात ५०१ तपासण्या केल्या. या तपासणीदरम्यान धूम्रपान करताना आढळलेल्या १०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती नीती सरकार यांनी दिली.
रेल्वेने याच काळात जनजागृती अभियानही राबविले. त्यात रेल्वेस्थानकावर उद्घोषणा करणे, पार्सल कर्मचारी, पार्सल आणि परवानाधारक पोर्टर्स, स्टेशनचे केटरिंग कर्मचारी, पेंट्री कार कर्मचारी, ओबीएचएस कर्मचाऱ्यांच्या जनजागृती बैठका घेण्यात आल्या. रेल्वे गाड्यांमध्ये आतापर्यंत घडलेल्या आगीच्या घटनांमध्ये सर्वसाधारणपणे शॉर्टसर्किट हे कारण, असे सामान्यांना वाटते. मात्र, आगीच्या घटनांसाठी विविध कारणे आहेत. फटाके किंवा फटाक्यांचा कच्चा माल, गॅस सिलिंडर, रेल्वेच्या आवारात किंवा डब्यामध्ये किंवा पार्सल म्हणून पेट्रोल, डिझेल, केरोसिन, स्टोव्ह, कंदील, रासायनिक पावडर या सारख्या ज्वलनशील पदार्थ रेल्वेत बाळगणे प्रतिबंधित असून, त्याविरुद्ध कारवाई होऊ शकते. रेल्वे प्रवासादरम्यान ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगून प्रवाशांनी स्वत:चा व हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात घालू नये, असा प्रकार आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी दिला आहे.