फेबु्रवारीपर्यंत महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे भूमीपुजन-राजूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:38 PM2018-11-11T23:38:03+5:302018-11-11T23:38:21+5:30
शहरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचे आश्वासन काँग्रेस पक्ष पूर्ण करणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे़
नांदेड : शहरात महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याचे आश्वासन काँग्रेस पक्ष पूर्ण करणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे़ येत्या फेब्रुवारीपर्यंत पुतळ्याच्या कामाचे भूमीपुजन करण्यात येईल असे प्रतिपादन आ़अमरनाथ राजूरकर यांनी केले़ भक्ती लॉन्स येथे आयोजित वीरशैव समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात ते बोलत होते़
यावेळी आ़राजूरकर म्हणाले, मेळाव्याच्या माध्यमातून आपला जोडीदार निवडण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळाले आहे़ वीरशैव समाजातील अनेक जण आज मोठ्या पदापर्यंत पोहचले आहेत़ अनेकांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे़ नांदेडात वीरशैव समाज मोठ्या प्रमाणात आहे़ त्यामुळे या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुढ पुतळा उभारणीसाठी जागा निश्चित करुन ती ताब्यात घेण्यात आली आहे़ पुतळ्यासाठी आदेशही देण्यात आले आहेत़ या का कामाला आता गती मिळाली असून येत्या फेब्रुवारीपर्यंत भूमीपुजनही करण्यात येईल असेही ते म्हणाले़
तत्पूर्वी आ़हेमंत पाटील म्हणाले, आपण सर्व महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचे पाईक आहेत़ म़बसवेश्वरांनी अनिष्ट रुढी, परंपरांना मुठमाती दिली़ त्यामुळे त्यांच्या विचारावर चालण्याची आज गरज आहे़ तर आ़राम पाटील रातोळीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले़ मेळाव्याचे प्रास्ताविक महाराष्ट्र वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हुरणे यांनी केले़ हुरणे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून वीरशैव सभा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करते़ दरवर्षी वधू-वर परिचय मेळावाही घेण्यात येतो़ यशस्विततेसाठी समाजबांधव परिश्रम घेत आहेत़ सुत्रसंचालन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश मारकोळे पाटील यांनी केले़ यावेळी राज्यातील अनेक जिल्ह्यातून तसेच शेजारील आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातून मोठ्या संख्येने वर-वधू उपस्थित होते़
कार्यक्रमाला मुद्रांक व नोंदणी शुल्क उपायुक्त जयराज कारभारी, कृषी अधीक्षक रवि चलवदे, शंकरराव बोरकर, सुमीत मोरगे, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे,विश्वनाथ देशमुख, लक्ष्मीकांत गोणे, नंदकुमार दुधेवार, शरणअप्पा दाडे, अशोक उमरेकर आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी सरचिटणीस राजन मिसाळे, महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी हुरणे, देवराव चिंचोलकर, प्रभाकर डांगे, रितेश बुरांडे, दिलीप हुरणे, केदार नागठाणे, व्यंकटेश बारोळे, कल्याणराव येजगे, प्रभाकर उदगीरे, माधवराव एकलारे, विजय होकर्णे, सुरेश मिटकरी, अमोल नागठाणे, शिवकुमार बुक्के, वैशाली मारकोळे पाटील, विजया इंद्राळे, चंदा हळदे, डॉ़विजया साखरे, डॉ़सारिका धोंडे, सुजाता मिसाळे आदींनी परिश्रम घेतले़
रातोळीकरांच्या निधीची घोषणा राजूरकरांनी केली
लिंगायत स्मशानभूमीसाठी माझ्या आमदार निधीतून दहा लाख रुपये आणि आ़राम पाटील रातोळीकर यांच्या निधीतून दहा लाख असे वीस लाख रुपये देणार असल्याची घोषणा आ़अमरनाथ राजूरकर यांनी केली़ यावेळी आ़राजूरकर यांनी रातोळीकर यांना उद्देशून तुमच्या परवानगीने ही घोषणा करीत असल्याचा चिमटाही काढला़