अवकाळीने नांदेड जिल्ह्याला घेरले; गारपीट, वारा अन् पावसाने केळी बागा, गहू भुईसपाट
By श्रीनिवास भोसले | Published: March 16, 2023 06:38 PM2023-03-16T18:38:48+5:302023-03-16T18:39:13+5:30
हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा कमालीचा अस्वस्थ झाला आहे.
नांदेड: जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात गुरूवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. वीजांचा कडकडाटाबरोबर झालेल्या पाऊस आणि गारपीटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुदखेड तालुक्यातील केळींच्या बागा, गहु भुईसपाट झाल्या तर हळद शिजविणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांची धांदल उडाली.
दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने बळीराजा चिंतेत होता. त्यात गुरूवारी दुपारी अचानकपणे वेगाचा वारा अन् वीजांचा कडकडाट होवून पावसाने हजेरी लावली. मुदखेड तालुक्यातील बारड, निवघा, इजळी परिसरात गारपीटसह पावसाने पिकांचे नुकसान केले. वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या झाला. तर कापणी केलेला गहु त्याचबरोबर काढलेली हळद पावसाने भिजली. लोहा, नायगाव तालुक्यात करडी, गहु, ज्वारी पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. पावसामुळे वीजेचे पोल आडवे झाले.
कापणी केलेला गहू, हळद झाकून ठेवलेल्या फाऱ्या, ताडपत्र्या वाऱ्याबरोबर उडून गेल्या. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा कमालीचा अस्वस्थ झाला आहे. वीजांचा कडकडाट अन् पाऊस सुरू असतानाही शेतकऱ्यांकडून शिजविलेली हळद, कापलेल्या गव्हाची वळई झाकून ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. परंतु, वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने जीव धोक्यात घालून केलेले शेतकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
पाऊस अन् गारपिटीने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे केले जाणार असल्याचे माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, लोहा, उमरी, भोकर, बिलोली, देगलूर, कंधार, मुखेड आदी तालुक्यातील बहुतांश गावात अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने अन् वेगाच्या वाऱ्याने शेतकऱ्यांसह सामान्यांचीही धांदल उडाली.