UPSC Results : अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला IAS अधिकारी; मोठ्या पगाराची नोकरी सोडून केली तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 07:08 PM2020-08-04T19:08:27+5:302020-08-04T19:11:17+5:30
अल्पभूधारक वडील हे निरक्षक असून अपंग आहेत.
कुरुळा (नांदेड ) : कंधार तालुक्यातील मौजे दिग्रस बु ता.कंधार येथील माधव विठ्ठल गिते यांनी युपीएसी परिक्षेत देशात २१० वी रँक मिळविली़ अल्पभूधारक वडील हे निरक्षक असून अपंग असतानाही ते शेतात राबतात़ माधव यांच्या यशामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे़
वडील विठ्ठलराव आणि आई तुळसाबाई दोघेही शेतात राबतात़ त्यांना एकूण पाच अपत्य़ तीन मुली व दोन मुले मोठा मुलगा भिवाजी विठ्ठल गिते हा सार्वजनिक बांधकाम विभागात ड्राफ्टमन म्हणून काम करतो. माधव लहानपणापासून अभ्यासात हुशार होते़ बारावीला विशेष प्राविण्यसह ते उत्तीर्ण झाले होते़ नंतर परभणी येथील शासकीय पॉलिटेक्नीक कॉलेजमधून डिप्लोमा विशेष गुणवतेसह उत्तीर्ण झाले़.
यानंतर सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज पुणे येथे असताना सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून मोठ्या कंपनीत त्यांची निवड झाली़ परंतु माधव यांचे मन कंपनीत रमत नव्हते़ भारतीय प्रशासन सेवा त्यांना खुणावत होती़ त्यामुळे नोकरीचा राजीनामा देवून त्यांनी सलग दोन वर्ष युपीएससीची तयारी केली़ त्यात यंदा त्यांना यश मिळाले़ अंगी अफाट ईच्छा शक्ती असल्यास उच्च पदावर जाण्यासाठी गरीबी, खेडेगाव, शाळा, कुठल्याही मर्यादा येत नाहीत हेच माधवने दाखवून दिले आहे.