UPSC Results : चार वेळा दिली यशाने हुलकावणी; अधिकारी भावांच्या प्रेरणेतून मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 07:13 PM2020-08-04T19:13:41+5:302020-08-04T19:19:27+5:30
शैक्षणिक वातावरण आणि भावांची प्रेरणा यातून अभ्यासात सातत्य राखत परीक्षेत यश मिळवले
नांदेड : एक भाऊ राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून लेखाधिकारी, दुसरा मंत्रालयात कक्षाधिकारी तर वडील शिक्षक असल्याने घरात शैक्षणिक वातावरण आणि भावांची प्रेरणा यातून अभ्यासात सातत्य राखत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवता आले अशी प्रतिक्रिया आकाश विनायक आगळे यांनी लोकमतशी बोलताना दिली़ आगळे यांनी युपीएससी परीक्षेत ३१३ वा क्रमांकावर यश मिळवले आहे़
आकाश आगळे हे मूळचे बिलोली तालुक्यातील नागणी येथील रहिवासी आहेत़ वडिल विनायकराव हे माहूर तालुक्यातील वानोळा येथे एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण हे वानोळा येथेच झाले़ ११ व १२ वीचे शिक्षण नांदेडमध्ये घेतले़ आकाश यांना दहावीत ९२ टक्के तर बारावीला ८८ टक्के गुण मिळाले होते़ त्यानंतर नांदेड येथीलच श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून २०१५ पासून दिल्ली येथे स्पर्धा परिक्षा अभ्यासाची तयारी सुरू केली़ एक नव्हे दोन नव्हे तर चार वेळा अपयश आल्यानंतर खचून न जाता आकाश आगळेनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले़.
पाचव्या प्रयत्नात यंदा यश मिळालेच़ नोव्हेंबर २०१९ मध्ये मुख्य परीक्षा झाली तर फेब्रुवारी २०२० मध्ये मुलाखत प्रक्रिया पार पडली होती़ अभ्यासातील सातत्य आणि कठीण परिश्रमाशिवाय यश मिळत नसते असे सांगताना नांदेड जिल्हा परिषदेत लेखाधिकारी असलेले भाऊ अमोल आगळे, मंत्रालयात कक्षाधिकारी असलेला भाऊ अविनाश आगळे यांची प्रेरणा आणि स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा मित्र रविंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन आपल्या यशात मोलाचे ठरल्याचे ते म्हणाले़
सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकारी महत्वाचे असतात, त्यांच्या मानसिकतेतून प्रश्नांची सोडवणूक होते़ आपले प्राधान्यही सामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास असल्याचे आगळे यांनी यावेळी सांगितले़