UPSC Results : क्या बात है...! पहिल्या प्रयत्नात आयपीएस, दुसऱ्यात आयएएस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 08:20 PM2020-08-04T20:20:59+5:302020-08-04T20:26:45+5:30
आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर यशाला गवसणी घालणे शक्य
नांदेड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी ता. नायगाव येथील योगेश अशोकराव पाटील यांनी देशात ६३ वा क्रमांक मिळविला. त्यांची जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती होणार आहे. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले. पहिल्या प्रयत्नात त्यांची आयपीएस पदावर निवड झाली होती.
लहानपणापासून जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न मी पाहिले होते. त्या दृष्टीने एक-एक पाऊल टाकत राहिलो. आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर यशाला गवसणी घालणे शक्य आहे, अशी प्रतिक्रिया योगेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी हे माझे प्रेरणास्थान आहेत. लहान स्वप्न पाहणे हा गुन्हा आहे, असे देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे. ते खरे आहे. युवकांनी नेहमी मोठेच स्वप्न पाहिले पाहिजे. त्यासाठी अथक परिश्रम, योग्य मार्गदर्शन होण्याची गरज आहे. सद्य:परिस्थितीतील सोशल मिडियाच्या आहारीही जाता कामा नये. असे झाले तरच स्वप्न सत्यात उतरण्यास वेळ लागणार नाही, असेही पाटील म्हणाले.
योगेश पाटील यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल शेळगाव गौरी ता. नायगाव येथे झाले. नायगाव तालुक्यातीलच धुप्पा येथील रामचंद्र पाटील विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर गावातीलच संत ज्ञानेश्वर महाविद्यालय येथून त्यांनी ११ व १२वीचे शिक्षण घेतले. बारावीनंतर सीओईपी पुणे येथून त्यांनी मेकॅनिकल ही अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी मिळविली. त्यानंतर ते युपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली येथे गेले. मागच्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात त्यांची आयपीएस पदावर निवड झाली होती. मात्र जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न असल्याने त्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि यात यश मिळविले. योगेश यांचे वडील शिक्षक आहेत. आई गृहिणी, भाऊ इंजिनिअर आहे.