८ लाख ४४ हजार बालकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 01:02 AM2019-02-09T01:02:32+5:302019-02-09T01:03:50+5:30
२७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गोवर, रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात झाली होती. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ८ लाख ४४ हजार ३४६ बालकांचे लसीकरण करण्यात आरोग्य विभागाला यश आले असून उद्दिष्टाच्या ९१.२७ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. शनिवारी मोहिमेअंतर्गतच्या लसीकरणाचा शेवटचा दिवस असून त्यानंतरही वंचित राहणाऱ्या बालकांना नियमित लसीकरण कार्यक्रमातून ही लस घ्यावी लागणार आहे.
नांदेड : २७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गोवर, रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात झाली होती. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ८ लाख ४४ हजार ३४६ बालकांचे लसीकरण करण्यात आरोग्य विभागाला यश आले असून उद्दिष्टाच्या ९१.२७ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. शनिवारी मोहिमेअंतर्गतच्या लसीकरणाचा शेवटचा दिवस असून त्यानंतरही वंचित राहणाऱ्या बालकांना नियमित लसीकरण कार्यक्रमातून ही लस घ्यावी लागणार आहे.
गोवर हा अत्यंत संक्रमक आणि घातक आजार आहे. जो मुख्यत: मुलांना होतो. गोवरमुळे दरवर्षी देशात ५० हजार रुग्ण मृत्युमुखी पडतात. तर रुबेला या आजाराचा संसर्ग गरोदरमातांना झाल्यास गर्भपात किंवा जन्मजात दोष निर्माण होऊ शकतात. यात बहिरेपणा आणि हृदयविकृती होऊ शकते. त्यामुळेच आरोग्य विभागाच्या वतीने गोवर, रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार २७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात या मोहिमेला सुरुवात झाली. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी अंतर्गतच्या यंत्रणेला ६ लाख ६ हजार ४९७ लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ५ लाख ६१ हजार ४४३ म्हणजेच उद्दिष्टाच्या ९२.२७ टक्के लसीकरण पूर्ण झाले. ४५ हजार ५४ बालकांच्या लसीकरणासाठी यंत्रणा कार्यरत आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांना १ लाख २० हजार ७३७ लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ३६ हजार ६८५ बालकांना लसीकरण करण्यात आले. म्हणजेच उद्दिष्टापेक्षा १३.२१ टक्के अधिक बालकांचे लसीकरण करण्यात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वाखालील यंत्रणा यशस्वी ठरली. तर नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीसाठी १ लाख ९७ हजार ८४० बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १ लाख ४६ हजार २८१ बालकांना लसीकरण करण्यात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले. महानगरपालिकेने उद्दिष्टाच्या ७३.९१ टक्के लसीकरण पूर्ण केले असून नांदेड शहरातील ५१ हजार ६२२ बालकांचे लसीकरण अद्यापही करावयाचे शिल्लक आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत मोहिमेला चांगले यश मिळाले आहे. राज्यात सर्वाधिक लसीकरण उस्मानाबाद जिल्ह्यात झाले. उद्दिष्टांहून अधिक म्हणजे ११३ टक्के लसीकरण करण्यात आले. लातूर जिल्ह्यात ९९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तर हिंगोली जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ९६ टक्के लसीकरण झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ९४ तर परभणी जिल्ह्यात ९३ टक्के लसीकरण झाले असून बीड जिल्ह्यात ८७ तर जालना जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ८१ टक्के लसीकरण करण्यात यंत्रणेला यश आले.
मोहिमेअंतर्गत लसीकरणाची आज शेवटची संधी
नांदेड महानगरपालिकेतंर्गतची ५१ हजार ६२२ बालके अद्यापही गोवर, रुबेला लसीकरणापासून दूर आहेत. तर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील एकूण ८० हजार ७२८ बालकांचे लसीकरण करावयाचे आहे. या सर्वांसाठी मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्याची अखेरची संधी शनिवारपर्यंत उपलब्ध आहे. ज्या बालकांचे अद्यापही लसीकरण झालेले नाही, अशा बालकांना शनिवारी संबंधित ठिकाणच्या केंद्रात जावून लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शनिवारनंतरही जी बालके लसीकरणाविना राहतील त्यांना नियमित लसीकरण केंद्रातून लसीकरणाची सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
गोवर हा प्राणघातक तसेच संसर्गजन्य रोग आहे. बालकांमधील अपंगत्व तसेच मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी हा रोग असल्याने शासनाने व्यापक मोहीम राबवून बालकांचे लसीकरण केले. मोहिमेदरम्यान काही अफवा पसरल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र जिल्हा प्रशासनाने याबाबत वेळीच जनजागृती मोहीम राबविल्याने आरोग्य विभागाच्या या उपक्रमाला चांगले यश मिळाले. जिल्ह्यातील ८० हजार बालके अद्यापही लसीकरणापासून दूर आहेत. त्यांनी शनिवारनंतर नियमित लसीकरण केंद्रात जावून बालकांचे लसीकरण करुन घ्यावे.
- डॉ. व्ही. आर. मेकाणे
जिल्हा आरोग्य अधिकारी, नांदेड