वडाचीवाडी, बुरुकुलवाडी, धनेवाडी गावांतील मतदानावरील बहिष्कार मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:17 AM2019-04-05T00:17:32+5:302019-04-05T00:18:03+5:30
विकास कामांची लेखी ग्वाही मिळाल्याने हिमायतनगर तालुक्यातील वडाचीवाडी, बुरुकुलवाडी, धनेवाडी आदी गावातील मतदारांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला.
हिमायतनगर: विकास कामांची लेखी ग्वाही मिळाल्याने हिमायतनगर तालुक्यातील वडाचीवाडी, बुरुकुलवाडी, धनेवाडी आदी गावातील मतदारांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला.
हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या वाळकेवाडी-दूधड गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वडाचीवाडी, बुरुकुलवाडी, धनवेवाडी आदिवासी बहुलगाव आहे़ हे स्वातंत्र्य काळापासून रस्ता व इतर सुविधांचा अभाव आहे़ येथील नागरिकांनी रस्ता व इतर सुविधासाठी मिळण्यासाठी दीड महिन्याभरापूर्वी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. हदगावचे उपविभागीय अधिकारी वडदकर यांनी सदरील गावासियांना रस्त्यासह इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे कागोदपत्री पाठपुरावा केल्याने त्या संदर्भाचे लेखीपत्र ४ रोजी तहसीलदार जाधव यांच्या हस्ते गावकऱ्यांना देण्यात आल्याने लोकसभा निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेण्यात आला. लेखी स्वरुपात आम्हाला पत्र देण्यात यावे तरच मतदानावरील बहिष्कार मागे घेण्यात येईल, असा निर्धार गावक-यांनी घेतला होता. आचारसंहिता संपल्यानंतर रस्त्याचे काम १४ व्या वित्तआयोगातून मार्गी लागले जाईल आणि इतर मागण्यासंदर्भात शासन दरबारी कागोदपत्री पाठपुरावा करुन निराकरण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन तहसीलदार जाधव यांंनी दिल्याने गावक-यांनी नियोजित बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला. तसे लेखी पत्र गावक-यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.
- रस्त्याच्या मागणीसाठी गावकरी वारंवार पाठपुरावा करीत होते. मात्र प्रशासन काही दाद देत नसल्याने गावक-यांनी लोकसभा निवडणुकीवरील मतदानावर बहिष्कार घालू, असे लेखी निवेदन संबंधितांना दिले. निवेदनानंतर प्रशासन जागे झाले आणि त्यांनी गावक-यांनी मनधरणी सुरु केली. मात्र आम्हाला लेखी आश्वासन द्या, तरच बहिषकार मागे घेवू, अशी भूमिका गावक-यांनी घेतली. तहसीलदारांनी लेखी दिल्यानंतर गावकºयांनी आंदोलन मागे घेतले.