बाभळी (आ.) सरपंचपदी वैशाली देशमुख, तर उपसरपंचपदी सागरबाई तुकडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:17 AM2021-02-14T04:17:12+5:302021-02-14T04:17:12+5:30
बाभळी (आ.) येथे नुकतेच सरपंच, उपसरपंचांची निवड प्रक्रिया पार पडली. येथील सरपंचपद हे ओपन महिलांसाठी राखीव असल्याने वैशाली मारोतीराव ...
बाभळी (आ.) येथे नुकतेच सरपंच, उपसरपंचांची निवड प्रक्रिया पार पडली. येथील सरपंचपद हे ओपन महिलांसाठी राखीव असल्याने वैशाली मारोतीराव देशमुख यांचा एकच अर्ज दाखल करण्यात आला असल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली; तर उपसरपंचपदासाठी सागरबाई शिवाजी तुकडेकर यांनी अर्ज दाखल केला होता. एकच अर्ज आल्याने तुकडेकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ७ सदस्यीय असलेल्या मौजे बाभळी ग्रामपंचायतीत मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या माजी उपसभापती असलेल्या देशमुख यांची एकहाती सत्ता होती. या वेळेस मात्र नवतरुण मारोती देशमुख यांनी देशमुखांविरुद्ध देशमुख यांनी स्वतःचे पॅनल तयार करून माजी सभापती देशमुख यांना धक्का देत सात सदस्यांपैकी पाच सदस्य निवडून आणले. त्यांच्याच पत्नी सरपंचपदी विराजमान झाल्या. वैशाली देशमुख, सागरबाई तुकडेकर ,गंगाराम मेहत्रे, संंगीता कुडकेकर, यादव कुडके, सुरेश देशमुख, शिवराज शिंदे या निवडीच्या वेळी असे एकूण सात (७) नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. सरपंच-उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निर्वाचन अधिकारी शंकर मेडेकर यांनी केले. या कामी ग्रामसेवक प्रकाश झरे यांनी सहकार्य केले.