भाजी-भाकरी पंगतीची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:34 AM2019-01-16T01:34:22+5:302019-01-16T01:35:06+5:30
तामसा येथील बारालिंग मंदिराची अनोेखी भाजी-भाकरी पंगत बुधवारी होणार आहे. यातून ग्रामीण जीवन, सामाजिक समता, भाजी-भाकरीचे महत्त्व अखोरेखित करणारी ही पंगत आहे.
हदगाव : तामसा येथील बारालिंग मंदिराची अनोेखी भाजी-भाकरी पंगत बुधवारी होणार आहे. यातून ग्रामीण जीवन, सामाजिक समता, भाजी-भाकरीचे महत्त्व अखोरेखित करणारी ही पंगत आहे.
येथील बारालिंग मंदिराची भाजी-भाकरी पंगत बुधवारी होणार असून यानिमित्ताने येथे प्रसादासाठी मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा या भागांतून हजारो भाविक हजेरी दरवर्षी लावतात. सव्वाशे वर्षांची परंपरा जपण्यासाठी तामशासह पंचक्रोशीतून शेकडो हात झटत आहेत. येथे दरवर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी (करदिनी) भाजी-भाकरीची पंगत होते. येथे भाकरी आणल्या जातात. खाण्यायोग्य फळे, भाज्या, फुले यांची आयुर्वेदिक भाजी मंदिर परिसरात शिजविली जाते. सव्वाशे वर्षांपूर्वी तामसा खेड्यासाठी असलेली पंगत आता मात्र ग्लोबल झाली आहे. येथे यानिमित्तमाने ग्रामीण जीवनाचे, संस्कृतीचे सुंदर चित्रण पहावयास मिळते. ग्रामीण भागातील मुख्य खाद्य असणारी भाकरी व भाजी यावरील प्रेम वाढविणारी ही पंगत ग्रामीण सांस्कृतिक अस्मिता जोपासत असते. येथील बारालिंगाचे शिवालय प्राचीन हेमाडपंती आहे. मुख्य पिंड ही जमिनीपासून भूगर्भात अंदाजे दहा फूट खोल आहे. मंदिरात उजव्या बाजूला बारा पिंडी आहेत. यामुळेच येथे बारालिंग नाव प्रचलित असावे. येथे जाण्यासाठी वाहनासाठी रस्ता असून जुन्या गावातील नागरिक नदी ओलांडून येतात. तसेच या भागातील अनेक गावांतून भाकरी बनवून पोहोचविल्या जातात.
ज्वारीच्या भाकरीची व भाज्यांची गोडी व चव याचा आस्वाद घेताना समाधान व्यक्त करतात. येथे दर्शन व प्रसादासाठी दरवर्षी भाविकांची गर्दी वाढत आहे; पण शांततेची, सुव्यवस्थेची परंपरागत अबाधित आहे. पंगत यशस्वीतेसाठी बारालिंग देवस्थान समिती व नियोजन समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत. यामध्ये पंगतीच्या वेळी प्रत्येक भाविकाला प्रसाद मिळण्यासाठीचे नियोजन ठरले. महिला- पुरुष भाविकांसाठी प्रसादाची स्वतंत्र व्यवस्था राहणार आहे. येथे येणारा भाविक हा प्रसादाविना राहणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.
- पंगत यशस्वी करण्यासाठी पोलीस, वीज वितरण यंत्रणा प्रयत्न करीत असून येथे एक दिवसासाठी आरोग्य विभागाचे स्वतंत्र पथक उपलब्ध राहणार असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष सूर्यवंशी यांनी सांगितले. पंगतीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन मंदिराचे पुजारी रेवणासिद्ध महाराज कंठाळे, संस्थानचे अध्यक्ष संतोष निल्लावार, कोषाध्यक्ष अनंता गोपाळे यांनी केले आहे.