भाजीपाला महागला
By admin | Published: November 6, 2014 01:42 PM2014-11-06T13:42:43+5:302014-11-06T13:42:43+5:30
यंदा जिल्हाभरात अत्यल्प पाऊसझाल्यामुळे याचा परिणाम खरिपासह, रबी हंगामात जाणवत आहे.
Next
नांदेड : यंदा जिल्हाभरात अत्यल्प पाऊसझाल्यामुळे याचा परिणाम खरिपासह, रबी हंगामात जाणवत आहे. विहिरी-बोअरची पाणीपातळी खालावत असल्याने महागाईचा फटका भाजी बाजारावर जाणवू लागला आहे. बुधवारच्या आठवडी बाजारात टोमॅटो, कोबी वगळता इतर सर्वच भाज्यांचे दर भडकले होते.
वाढत्या दरामुळे शेतकर्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी सर्वसामान्यांना मात्र आर्थिक झळ सोसावी लागत आहे. वाढलेल्या पालेभाज्यांच्या दरामुळे अनेकांनी पिशव्या भरुन भाजीपाला घेणे टाळल्याचे चित्र होते.
गेल्या महिन्यात भाजीपाल्याचे दर आवाक्यात होते, तर दोन महिन्यांपूर्वी शेतकर्यांना टोमॅटो अक्षरश: रस्त्यावर फेकून द्यावे लागले होते. यानंतर पुन्हा टोमॅटोचे भाव प्रतिकिलो ४0 रुपयांवर पोहोचले होते. तर बुधवारच्या आठवडी बाजारात टोमॅटोला १0 ते १५ रुपये किलो एवढाच दर मिळाला. तर हिरवी मिरची ६0 रुपये किलो, वांगी ४0 रुपये किलो, फूलकोबी ४0 रुपये किलो, पानकोबी ४0 रु.किलो, कोथिंबीर १00 रु.किलो, कांदे २0 रुपये किलो, लसूण ८0 रु.किलो, बटाटे ४0 रु.किलो, ढोबळी मिरची ६0 रु. भेंडी ४0 रु. किलो, कारले ६0 रु.किलो, पालक १0 रु.जुडी, शेवग्याच्या शेंगा ८0 रुपये किलो, गवार ८0 रुपये किलो याप्रमाणे दर होते. यंदाची पावसाची अल्प स्थिती पाहता उन्हाळ्य़ात भाजीपाल्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
बहुभूधारक व अल्पभूधारक शेतकर्यांनी उन्हाळ्य़ातील उपलब्ध विहिरी, बोअरमधील पाण्याची स्थिती लक्षात घेवून केळी, हळद, गव्हाची लागवड न करता कमी दिवसांत येणार्या भाजीपाला लागवडीस पसंती दिली. अनेक विहिरी-बोअरमधील पाणीपातळी घटत असल्याने उत्पादक पुन्हा अडचणीत सापडणार असून महागाईचा फटकाही सर्वसामान्यांना बसणार आहे. पावसाअभावी भाजीपाल्याची लागवड केलीच नाही. बाजारात आवक कमी होत असून दरात वाढहोत आहे. (प्रतिनिधी)