वाहने विझविणारेच निघाले जाळणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:17 AM2020-12-24T04:17:26+5:302020-12-24T04:17:26+5:30
हदगाव : तालुक्यातील तामसा येथे १९ डिसेंबर रोजी घरासमोरील सात वाहने जळाल्याची घटना घडली होती. ही वाहने विझवण्यासाठी प्रयत्न ...
हदगाव : तालुक्यातील तामसा येथे १९ डिसेंबर रोजी घरासमोरील सात वाहने जळाल्याची घटना घडली होती. ही वाहने विझवण्यासाठी प्रयत्न करणारेच आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दारूच्या नशेत आरोपींनी हा प्रकार केल्याचेही सांगितले जाते.
सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापत आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांना दारू पाजण्याचे काम करीत आहे. तामसा येथे असाच प्रकार सुरू आहे. शनिवारी रात्री १० च्या दरम्यान फुकटची दारू पिऊन काहींनी वाहनांची होळी केली. दुचाकीतील पेट्रोल काढून घराबाहेरील वाहने पेटविणे सुरू केले. यामध्ये बबलू सय्यद, गजानन बंडेवार, राम बंडेवार, किशोर मुळावकर, अशोक लाभशेटवार यांची वाहने पेट्रोल टाकून जाळण्यात आली. तर नंदू कंटाळे यांची दुचाकी गणेश शिंदे यांचा ऑटोही जाळण्यात आला. संशय येऊ नये म्हणून आरोपी नंदू कंटाळेचे वाहन विझवण्यासाठी हजर होते.
एका पोलीस मित्राने दिलेल्या माहितीवरून सपोनि नामदेव मद्दे यांनी या प्रकरणातील एकाला उचलले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अक्षय खंडाळे (वय २५), किशोर चांदनकर (वय २४), कैलास सूर्यवंशी (वय २६) या तिघांना अटक केली असून संभा जाधव उर्फ सोन्या हा फरार आहे. दारूच्या नशेत आपण हे कृत्य केल्याचे आरोपीने कबूल केल्याची माहिती मद्दे यांनी दिली. गणेश शिंदे यांच्या तक्रारीवरून या घटनेची नोंद तामसा पोलिसात झाली होती.