नांदेड जिल्ह्यातील २० गावांत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:26 AM2018-05-19T00:26:37+5:302018-05-19T00:26:37+5:30
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग मान्सनपूर्व तयारीला लागला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कुठल्याही आजाराची साथ पसरु नये, यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील २० गावांत ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्यही राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी व्ही. आर. झिने यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग मान्सनपूर्व तयारीला लागला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कुठल्याही आजाराची साथ पसरु नये, यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील २० गावांत ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्यही राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी व्ही. आर. झिने यांनी सांगितले.
दरवर्षी पावसाळ्यात जलजन्य, कीटकजन्य आजारांची साथ उद्भवते. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मान्सनपूर्व तयारी हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून २८ ते ९ मे या कालावधीत जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत ० ते ५ वर्षे या वयोगटातील बालकांच्या घरोघरी जाऊन ओआरएस पाकिटांचे वाटप करण्यात येणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांसह मातांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी विविध शाळांमध्येही प्रात्यक्षिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. डायरियाच्या अनुषंगानेही विशेष दक्षता घेण्यात येत असून मोहिमेमध्ये डायरियाचा रुग्ण आढळल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
याबरोबरच २१ ते २४ मे या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य अभियान राबविण्यात येणार आहे.
यासाठी केंद्र शासनाने जिल्ह्यातील १० तालुक्यांतील २० गावांची निवड केली आहे. या गावांमध्ये एप्रिल महिन्यात अभियानाची पहिली फेरी राबविण्यात आली असून आता २१ मे पासून दुसºया फेरीला प्रारंभ होत आहे. या अभियानांतर्गत गरोदरमाता आणि ० ते २ वर्षे या वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार असल्याचेही जिल्हा बालआरोग्य अधिकारी झिने यांनी सांगितले.
दरम्यान, दरवर्षी जिल्ह्यात पावसाळ्याच्या काळात जलजन्य, कीटकजन्य आजारामुळे साथीचे रोग पसरतात़ नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाणीपुरवठ्यामुळे पावसाळ्याच्या काळात रुग्णसंख्येत मोठी वाढ होते़ त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व तयारीला वेग आला आहे़
साथरोग नियंत्रणासाठी मनपाचा विशेष कक्ष
मान्सूनपूर्व उपाययोजनांच्या अनुषंगाने महानगरपालिकेने जंगमवाडी येथील दवाखान्यात साथरोग नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. याबरोबरच नांदेड शहराचे १५ झोन तयार करुन झोननिहाय वैद्यकीय अधिकाºयांच्या नेमणुका केल्या आहेत. साथरोग नियंत्रणासाठी मनपाच्या सर्व दवाखान्यांत प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आली असून योग्य त्या संदर्भसेवा या दवाखान्यात नागरिकांना मिळणार आहेत. अतिसंवेदनशील व झोपडपट्टी परिसरात मनपाच्या आरोग्य विभागामार्फत रक्तनमुने तपासणी तसेच औषधोपचारही करण्यात येणार असल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.
डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आदी आजार डासांमार्फत तर गॅस्ट्रो, कॉलरा, विषमज्वर, अतिसार या पाण्यामार्फत पसरणाºया आजारांची वाढ होऊ नये यासाठी कर्मचाºयांना दक्ष राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. अतिसार नियंत्रण पंधरवडा आणि मिशन इंद्रधनुष्य हे मान्सूनपूर्व तयारी म्हणून राबविण्यात येत आहे. मलेरियाचाच रुग्ण आढळल्यास मलेरिया विभागाच्या वतीने संबंधित ठिकाणी फॉगिंगही करण्यात येणार आहे.
-व्ही.आर.झिने, जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नांदेड.