पैनगंगेचे पाणी ओसरल्याने ३५ तासानंतर विदर्भ-मराठवाड्याची वेटिंग संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 07:28 PM2021-09-30T19:28:02+5:302021-09-30T19:29:11+5:30
बुधवारपासूनच पुलावरून पाणी जात असल्याने विदर्भ-मराठवाड्याकडे जाणारी व येणारी वाहतूक ठप्प झाली होती.
नांदेड : इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडण्यात आल्याने नदीला मोठा पूर आला. पुराचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने विदर्भ-मराठवाडा जोडणाऱ्या पुलावर सुमारे ३५ तास वाहतूक ठप्प होती. गुरुवारी सकाळनंतर पुलावरील पाणी हळूहळू कमी झाल्याने दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
बुधवारपासूनच पुलावरून पाणी जात असल्याने विदर्भ-मराठवाड्याकडे जाणारी व येणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजुने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामध्ये अडकलेल्या प्रवाशांची खानपाणाची बरीच गैरसोय झाली. हदगाव-उमरखेड मार्गावर हदगावचे तहसीलदार जीवराज डापकर, पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, उमरखेडचे संबंधित अधिकारी हे जातीने उपस्थित होते. १५ मिनिटे हदगावचे आणि १५ मिनिटे उमरखेडची अशा पद्धतीने वाहने सोडण्यात आल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. ३५ तासापासून वाहतूक थांबल्याने उमरखेड तालुक्यातील मार्लेगावजवळ मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याशिवाय अनेक प्रवासी हदगाव-उमरखेडमध्ये अडकून पडले होते. अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी स्थानिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी जेवण, पिण्याच्या पाण्याची, फळांची सोय केली.
दरम्यान, गुरुवारी सकाळी ८ वाजता जुना पूल नांदेड येथील पाण्याची पातळी ३५३.१० मीटर झाली होती. पुलाची अलर्ट लेवल ३५१ मीटर तर धोकादायक पातळी ३५४ मीटरची आहे. दुसरीकडे जायकवाडी धरणाचे पाणी विष्णुपूरीत पोहोचल्यानंतर नदीकाठच्या लोकांना धोका निर्माण होवू शकतो. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या काही जणांना महापालिकेने निवारा केंद्रात हलवले आहे.