Video: शेतकऱ्याचे थेट तहसील कार्यालयावर शोलेस्टाईल आंदोलन, प्रशासनाची बघ्याची भूमिका
By प्रसाद आर्वीकर | Published: October 13, 2022 06:55 PM2022-10-13T18:55:52+5:302022-10-13T18:56:18+5:30
शेतीच्या फेरफार मंजूरीसाठी शेतकऱ्याचे शोलेस्टाईल आंदोलन, मुखेड तालुक्यातील घटना
मुखेड (नांदेड) : शेतीचा फेरफार मंजूर होत नसल्याने तालुक्यातील एका शेतकऱ्याने १३ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयाच्या छतावर चढून शोलेस्टाईल आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. अर्धा ते पाऊण तासाच्या या आंदोलनामुळे तहसील परिसरात बघ्यांची गर्दी जमा झाली होती.
मुखेड तालुक्यातील कामजळगा येथील शेतकरी सचिन संदीपान वाघमारे (३५) यांनी शेतीचा फेरफार होत नसल्याने मंडळ अधिकारी यांच्याविरोधात हे आंदोलन केले. कामजळगा (दिंडेवाडी) येथील शेतकरी सचिन वाघमारे व त्यांचे काका काशिनाथ वाघमारे यांच्यात वाटणी झालेल्या शेतीचा फेरफार करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात तलाठी शिवराज नागेश्वर यांना अर्ज दिला होता. तलाठी नागेश्वर यांनी २५ ऑगस्ट रोजी ऑनलाइन नोंद केली. त्यानंतर मंडळ अधिकारी सुहास मुळजकर यांनी रजिस्टर वाटणीपत्र नसल्याने अर्ज नामंजूर केला होता.
नांदेड: शेतीच्या फेरफार मंजूरीसाठी शेतकऱ्याचे शोलेस्टाईल आंदोलन, मुखेड तालुक्यातील घटना pic.twitter.com/tqN0McXFwt
— Lokmat (@lokmat) October 13, 2022
यानंतर सचिन वाघमारे यांनी वारंवार तहसील कार्यालय व मंडळ अधिकाऱ्यांना भेटूनही फेरफार झाला नाही. त्यामुळे गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सचिन वाघमारे यांनी तहसील कार्यालयाच्या छतावर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले. छतावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती. पोलीस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे यांनी या शेतकऱ्याला समजावून घरी पाठवून दिले. एवढी मोठी घटना घडल्यानंतर तहसील प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत होते. तहसीलदार कार्यालयात उपस्थित नव्हते. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी कुठलीही कारवाई केली नाही.