नोकरी विजेंद्रला, बोहल्यावर चढला जयेंद्र !; देगलूरच्या कुटुंबाने तरुणीची केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 07:19 PM2019-02-06T19:19:51+5:302019-02-06T19:20:52+5:30
जयेंद्र आणि विजेंद्र हा एकच व्यक्ती असल्याचे भासवून विवाहितेची फसवणूक
नांदेड : लग्नात स्थळ दाखविताना लहान भावाच्या नोकरीचे कागदपत्रे दाखवून प्रत्यक्षात बोहल्यावर मात्र मोठा भाऊ चढला़ जयेंद्र आणि विजेंद्र हा एकच व्यक्ती असल्याचे भासवून विवाहितेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी देगलूरच्या सात जणांविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
तेजश्री (नाव बदलले) या अहमदपूर येथील तरुणीसाठी देगलूर येथील जयेंद्र बाबूराव जाधव यांचे स्थळ आले होते़ त्यावेळी जाधव कुटुंबियांनी तेजश्रीच्या कुटुंबियांना जयेंद्र आणि विजेंद्र अशी एकाच वराची दोन नावे असल्याचे सांगत त्यांना विजेंद्रची शैक्षणिक कागदपत्रे दाखविली होती. वास्तविक जयेंद्रचे शिक्षण जेमतेम असून विजेंद्र हा पुण्यात नोकरीला आहे़ परंतु, जयेंद्र आणि विजेंद्र हे दोघेही एकच असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी भासविले. तेजश्री आणि जयेंद्रचे १० डिसेंबर २०१८ रोजी लग्न झाले़ परंतु, लग्नाच्या एक महिन्यानंतरच जयेंद्रच्या कुटुंबियांनी तेजश्रीला त्रास देण्यास सुरुवात केली़ माहेराहून २५ लाख रुपये घेवून येण्याची मागणी करण्यात येत होती़
लग्नानंतर आले सत्य समोर
दरम्यान, लग्नानंतर जयेंद्र आणि विजेंद्र या एक व्यक्ती नसून दोन वेगवेगळ्या व्यक्ती असल्याची बाब तेजश्रीच्या कुटुंबियांना समजली़ त्यावेळी तेजश्रीच्या माहेरच्यांना तर धक्काच बसला़ याबाबत त्यांनी जाधव कुटुंबियांकडे विचारणा केली असता, तेजश्रीला घरातून हाकलून लावण्यात आले़
सर्व आरोपी फरार
याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन अहमदपूर पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपावरुन जयेंद्र जाधव, राजश्री जाधव, बाबूराव जाधव, संजीवनी जाधव, विठ्ठल जाधव, विजेंद्र जाधव व चरण जाधव यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, या प्रकरणात विवाहितेची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून या गुन्ह्यात फसवणुकीचे कलम वाढविण्याबाबत अहमदपूर पोलिसांनी न्यायालयात पत्र दिले आहे़ या प्रकरणातील सर्व आरोपी मात्र फरार आहेत़