...या गावात महिनाभरात तब्बल ५५ जणांना सर्पदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 07:19 PM2018-09-13T19:19:07+5:302018-09-13T19:19:31+5:30
तालुक्यातील आदमपूर गावात गेल्या महिन्यापासून विषारी-बिनविषारी सापांचा वावर वाढला आहे़
बिलोली : तालुक्यातील आदमपूर गावात गेल्या महिन्यापासून विषारी-बिनविषारी सापांचा वावर वाढला आहे़ महिनाभरात गावातील तब्बल ५५ जणांना सर्पदंश झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे़ एकूणच या प्रकाराने गावात घबराट निर्माण झाली आहे.
आदमपूर व परिसरात गेल्या एका महिन्यापासून मूग, उडीद आदी पिकांची काढणी जोमाने सुरु आहे. पाऊस, उष्णता असे मिश्र वातावरणाचे आहे. शेतकरी कामात असताना सापांचाही उपद्रव वाढला आहे. एका महिन्यापासून सर्पदंशाची ही मालिका सुरु झाली असून अगदी सुरुवातीलाच यलप्पा उठवाड यांचे सर्पदंशाने निधन झाले होते. तेव्हापासून सतत येथे रोज एका-दोघांना सर्पदंश होत असून गत महिनाभरापासून तब्बल ५५ लोकांना सर्पदंशाने विषबाधा झाली. पैकी एकाचा मृत्यू झाला. सर्पदंश झालेल्यांना नातेवाईकांनी खाजगी व वैद्यकीय उपचार तात्काळ करुन यातून बरे केले असले तर सापांचा उपद्रव काही थांबता थांबेना. ५५ पैकी गत पंधरवड्यातच तब्बल ३५ लोकांना सर्पदंश झाला होता.
या प्रकाराने आदमपूरवासियांत घबराटीचे वातावरण आहेच़ त्याशिवाय महिला व मजूरवर्ग सापाच्या भीतीने शेतीच्या कामाकडेही जाण्यासाठी धजावत नाही. सायंकाळी दिवा, मोबाईल, बॅटरी व अन्य विद्युत उपकरणे घेऊनच नागरिक बाहेर पडत आहेत.