लोकसहभाग आणि श्रमदानातून गावाचा कायापालट होऊ शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:16 AM2021-02-08T04:16:12+5:302021-02-08T04:16:12+5:30
नांदेड - लोकसहभाग आणि श्रमदानातून गावाचा कायापालट होऊ शकतो, असे मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ...
नांदेड - लोकसहभाग आणि श्रमदानातून गावाचा कायापालट होऊ शकतो, असे मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी व्यक्त केले.
‘माझा गाव, सुंदर गाव’ उपक्रमांतर्गत ७ फेब्रुवारी रोजी नांदेड तालुक्यातील कोटीतीर्थ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. नांदेड पंचायत समितीच्या सभापती कावेरी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी ए. एन. सरोदे, बबन वाघमारे, गटशिक्षणाधिकारी रुस्तम आडे, बालविकास प्रकल्प अधिकारी विजय बोराटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी मिरकुटे, कृषी अधिकारी राहुल राऊत, व्ही. आर. चिंचोलकर, पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, उपअभियंता शास्त्री, वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. चव्हाण, प्रशासक विस्तार अधिकारी सतीश लाकडे, आदी उपस्थित होते. डाॅ. ठोंबरे म्हणाले, सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावासाठी श्रमदान करावे. आपले घर, परिसर व गाव नेहमीच स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. दर गुरुवारी एक दिवस गावासाठी द्या, श्रमदानातून गावे बदलतील. हे अभियान यशस्वी करण्यासाठी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांचे प्रबोधन करावे.
यावेळी गटविकास अधिकारी ए. एन. सरोदे यांनी ‘माझा गाव, सुंदर गाव’ या उपक्रमांतर्गत गावात करण्यात येणाऱ्या कामांची ग्रामस्थांना माहिती दिली. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे यांनी स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे, उपअभियंता शास्त्री यांनीही मनोगत व्यक्त केले. तालुक्यातील सर्व गावांमधून ‘माझा गाव, सुंदर गाव’ ही संकल्पना लोकचळवळ म्हणून राबवून तालुक्यातील सर्व गावे सुंदर करण्याचा संकल्प विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांनी केल्याचे विस्तार अधिकारी जीवन कांबळे यांनी सांगितले.