गावपातळीवरील ग्राम समित्या कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:50 AM2020-12-04T04:50:09+5:302020-12-04T04:50:09+5:30
सगरोळी : शेत, शिव, पाणंद व गाव रस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी गावपातळीवर गाव रस्ता समिती गठित करण्याचा ...
सगरोळी : शेत, शिव, पाणंद व गाव रस्त्यांची कामे करण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी गावपातळीवर गाव रस्ता समिती गठित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्यापही तालुक्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नसून, गाव रस्ता समिती केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शेतीला लागणारी यंत्रसामग्री शेतापर्यंत नेता यावी, शेतमालाला बाजारात पोहोचवण्यासाठी आवश्यक रस्त्याची (पाणंद) कामे पूर्णत्वाला नेण्यासाठी गावपातळीवर गाव समित्या स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन राज्य शासनाने घेतला होता. तहसील कार्यालयामार्फत ग्रामपंचायतींना परिपत्रकाद्वारे अशा समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ज्यामध्ये सरपंच अध्यक्ष, तर मंडळाधिकारी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, विकास सोसायटी, प्रगतशील शेतकरी, ग्रामपंचायतच्या महिला सदस्या, ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी, पोलीस पाटील, तलाठी, कृषी सहायक अधिकारी, बीट जमादार आदींचा समावेश असलेल्या समितीची नियुक्ती केली जाणार होती; पण गावपातळीवर अशा समित्या अद्याप कागदावरच असून, याबाबत परिपूर्ण अंमलबजावणी झाली नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. गाव, पाणंद, शेत व वहिवाटीखाली असलेले रस्ते मोकळे करणे, तसेच यासंदर्भातील उद्भवणारे वाद गावपातळीवरच मिटविण्याच्या उद्देशाने ग्राम समिती काम करणार होती.
तसेच माती, दगड व मुरूम टाकून रस्त्याचे मजबुतीकरण करणे आदी कामे केली जाणार आहेत; पण अद्याप या समित्या कागदावारच राहिल्या आहेत. रस्त्यासंदर्भात बिलोली तहसील कार्यालयात अनेक तक्रारी, तर पंचायत समितीमध्ये अनेक फायली पडून आहेत. मात्र, तहसील व पंचायत समितीकडून स्थळ पाहणी करून या फायली व तक्रारी तात्काळ निकाली काढाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
कोट
शेतकरी नैसर्गिक संकटाने हैराण झाला आहे. सध्या शेतात जाण्यासाठी असलेल्या वहिवाट, पाणंद, गाव आणि शिवार रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. प्रशासनाने गावपातळीवर समित्यांच्या माध्यमातून रस्ते अतिक्रमणमुक्त करून खुली करून शिव पाणंद रस्ते तात्काळ तयार करावीत.
-परिसरातील शेतकरी
बारड बीएसएनएल ऑफिस कुलूपबंदच
बारड येथील बीएसएनएल ऑफिस कुलूपबंदच असल्याने ग्राहकांना वेळेत सेवा मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. थ्रीजी सेवा नेटवर्क अनेक वेळा गायब असल्याने भ्रमणध्वनी सेवा नेट सेवा विस्कळीत होत आहे, याची तक्रार निवारण करण्यासाठी ऑफिस बंद असल्याने येथील बीएसएनएल ग्राहक अडचणीत येत असतात. याठिकाणी कायमस्वरूपी अधिकारी नेमून ऑफिस सेवा सुरळीतपणे मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.