ग्रामस्थांनी सोडले गाव, अन् कोरोनाही पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:18 AM2021-05-12T04:18:24+5:302021-05-12T04:18:24+5:30
नांदेड: दोन महिन्यांपूर्वी पहिला रुग्ण आढळलेल्या भोकर तालुक्यातील भोसी गावातील रुग्णांची संख्या पाचवर गेल्यानंतर ६ हजार लोकवस्तीचे हे गाव ...
नांदेड: दोन महिन्यांपूर्वी पहिला रुग्ण आढळलेल्या भोकर तालुक्यातील भोसी गावातील रुग्णांची संख्या पाचवर गेल्यानंतर ६ हजार लोकवस्तीचे हे गाव हादरून गेले होते. त्यानंतर गावातील प्रत्येकाची सलग चाचणी करून बाधित आढळून आलेल्या ११९ जणांना शेतात वस्तीवर हालविण्यात आले. अवघ्या १५ दिवसानंतर सर्वच बाधित कोरोनामुक्त झाले. त्यानंतर दीड महिन्यापासून हॉटस्पॉट ठरलेल्या भोसी गावात एकही बाधित आढळून आलेला नाही. भोसीचा हा कोरोनामुक्तीचा पॅटर्न ग्रामीण महाराष्ट्रसाठी दिशादर्शक ठरणारा आहे.
नांदेड ३० कि.मी. अंतरावर ६ हजार लोकवस्तीचे भोसी गाव आहे. साधारण दोन महिन्यांपूर्वी येथे एका लग्नसोहळ्यानंतर एक मुलगी बाधित आढळली. त्यानंतरच्या आठवड्यात आणखी पाच बाधित निष्पन्न झाल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर यांनी ग्रामपंचायतीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत भयभीत झालेल्या ग्रामस्थांचे समुपदेशन करण्यात आले आणि गावात जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार चाचण्यांना सुरुवात झाली. या तपासण्यामध्ये तब्बल ११९ जण बाधित निष्पन्न झाले. तपासणीनंतर बाधित आलेल्यांची तेथूनच शेतात रवानगी करण्यात आली. यासाठी प्रत्येकाच्या शेतात राहण्याची सोय करण्यात आली होती. ज्यांच्याकडे शेती नाही त्यांची सोय भोसीकर यांच्या शेतातील ४० बाय ६० आकाराच्या एका शेडमध्ये केली होती. हे सर्व बाधित सुमारे १५ दिवस शेतामध्येच राहिले. आरोग्य सेविका, आशा वर्कर दररोज शेतात जाऊन बाधितांशी संवाद साधत होत्या. तसेच गरजेनुसार रुग्णांना जागेवरच औषधे पुरविण्यात आली. दुसरीकडे या बाधितांच्या जेवणाची सोयही शेतामध्येच करण्यात आली होती. त्यामुळे १५ दिवसानंतर सर्वच्या सर्व ११९ बाधित काेराेनामुक्त झाले. त्यानंतर दीड महिना उलटून गेला; मात्र तेथे एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
कोट......
एकाच दिवशी तपासणी करून सर्व बाधितांची शेतामध्ये रवानगी केली. तेथे त्यांच्या जेवणासह औषध पाण्याची सोय केल्याने गाव कोरोनामुक्त झाले. त्यानंतर कोरोना रोखण्यासाठीच्या त्रिसूत्रीचे कटाक्षाने पालन केले जात असल्याने दीड महिन्यापासून गावात एकही रुग्ण आढळलेला नाही.
- प्रकाश देशमुख भोसीकर, जि.प. सदस्य
सुरुवातीला तपासण्यांसाठी ग्रामस्थ घाबरत होते. मात्र त्यांचे समुपदेशन केले. तसेच बाधितांवर शेतामध्येच उपचार सुरू करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी शेतात जाऊन औषधे पुरविली. आता गाव कोरोनामुक्त झाले आहे. ग्रामस्थ एकत्रित आले तर काय चमत्कार घडू शकतो हे भोसी गावाने दाखवले आहे.
- डॉ.यू.एम. डोंगरे, आरोग्य अधिकारी, भोसी
कोरोना आजार भयानक आहे; मात्र योग्य उपाययोजना वेळीच केल्यास त्यावर मात करता येऊ शकते. हा विश्वास ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे. मागील दीड महिन्यापासून गावात एकही रुग्ण नाही. मात्र ग्रामस्थ कोरोना नियमांचे काटेकोर पालन करतात.
- कृष्णाबाई सरपाते, ग्रामस्थ
दोन महिन्यांपूर्वी मी बाधित असल्याचे आढळल्यानंतर शेतामध्ये जाऊ राहिलो. पंधरा दिवस तेथेच औषध, गोळ्या घेतल्या. घरातील मंडळी शेतात जेवणाचा डब्बा पाठवित होते. आता कोरोनामुक्त झालो आहे.
- देवराव कल्याणकर, ग्रामस्थ
जुन्या काळात प्लेगसारखे साथीचे आजार आल्यावर ग्रामस्थ गाव सोडायचे. त्याप्रमाणे आम्हीही बाधितांना गाव सोडून शेतात पाठविले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही. शिवाय बाधितांना शेतातच उपचार दिल्याने ते लवकर कोरोनामुक्त झाले. - मारोती झंपलवार, ग्रा.पं. सदस्य
फोटो. नं
प्रकाश देशमुख - ११एनपीएचएमएवाय-२३
डॉ.यू.एम. डोंगरे -एनपीएचएमएवाय-२५
कृष्णाबाई सरपाते -एनपीएचएमएवाय-२४
देवराव कल्याणकर - एनपीएचएमएवाय-२७
मारोती झंपलवार - एनपीएचएमएवाय-२८
बाधित आढळून आल्यानंतर शिवारातील शेतात बाधितांची अशी शेडमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. - एनपीएचएमएवाय-२९
भोसी गावाचा बोर्ड - एनपीएचएमएवाय-३०