बिनविरोधमागचा फंडा! निधी मिळेल तेव्हा मिळेल, सरपंचपदाच्या बोलीतून होणार गावचा विकास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 12:00 PM2022-12-22T12:00:19+5:302022-12-22T12:00:37+5:30
बिनविरोध ग्रामपंचायतीमागे असेही सत्य; गावाच्या विकासासाठी चक्क सरपंचपदाची बोली लावण्यात आल्याचे पुढे आले आहे
नांदेड : गावाचा विकास करायचा तर पैसा पाहिजे. निधी मिळेल तेव्हा मिळेल. पण, आता नुसती विकासाची हमी न घेता थेट सदस्य आणि सरपंच पदे विकण्याचा प्रकार जिल्ह्यात झाला असून, काही ग्रामपंचायती बोली लावून बिनविरोध केल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.
जिल्ह्यातील १८१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये १९ ग्रामपंचायतींची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भांडण-तंटे, वाद वाढतात. निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांवर कुरघोडी केली जाते. यातून विकासकामे बाजूला पडतात. शिवाय निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाचाही वारेमाप खर्च होतो. हे सर्व टळावे, यासाठी सर्वांनी एकत्र बसून एकमताने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याची आदर्श परंपरा सुरु करण्यात आली.
जिल्ह्यात यावेळच्या निवडणुकीत मात्र ४ गावांमध्ये ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी चक्क बोली लावल्याची चर्चा होत आहे. पुढाऱ्यांनी आकडा सांगून संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध काढयाची. जो मोठी बोली लावेल त्याचा सरपंच आणि सदस्य एकमताने बिनविरोध निवडण्यात आला आहे.
गावातील रस्ते, सांस्कृतिक सभागृह, स्वच्छतेची कामे, सामूहिक कार्यक्रमांसाठी लागणारा खर्च आदी गावातील विकासाची कामे बोलीतून मिळालेल्या रक्कमेतून केली जाणार आहेत. चार गावांमध्ये असा प्रकार झाला असून, बोली लावून ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली आहेत, अशी चर्चा सध्या होत आहे.