आचारसंहितेचे उल्लंघन; महाविकास आघाडीच्या आजी-माजी आमदार, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 12:29 PM2024-04-03T12:29:13+5:302024-04-03T12:35:03+5:30
व्हिडिओ फुटेज आधारे लोहा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
- गोविंद कदम
लोहा: शहरातील व्यंकटेश गार्डन येथे लातूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारात लोहा-कंधार तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक २ एप्रिल रोजी ठेवण्यात आली होती. मात्र निवडणूक विभागाकडून बैठकीची व बॅनर लावण्याची कोणती परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नांदेड दक्षिणचे आ. मोहन हंबर्डे, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, शिवसेना उबाठाचे संघटक एकनाथ पवार, आ. श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे, कॉग्रेस तालुकाध्यक्ष शरद पवार ,आनिल मोरे ,माजी जि.प सदस्य रंगनाथ भुजबळ यांच्यासह इतर वीस ते पंचवीस जणांच्या विरोधात लोहा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक निवडणूक अधिकारी,उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांचे विविध पथकाच्या माध्यमातून बारीक लक्ष आहे. व्हिडिओ फुटेज आधारे जिल्हा परिषदेचे अभियंता शिवाजी राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राम केंद्रे हे पुढील तपास करत आहेत.