कोरोना तपासणीतही होतेय फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:17 AM2021-03-14T04:17:44+5:302021-03-14T04:17:44+5:30
नागरिकांनीही खबरदारी घ्यावी- बिसेन शहरातील नाना-नानी पार्क येथे कोरोना तपासणी केली जात आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा प्रादुर्भाव पाहता, तपासणी ...
नागरिकांनीही खबरदारी घ्यावी- बिसेन
शहरातील नाना-नानी पार्क येथे कोरोना तपासणी केली जात आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा प्रादुर्भाव पाहता, तपासणी वाढविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे तपासणीसाठी लोक केंद्रावर येत आहेत. आमचे अधिकारी सूचना देत आहेत, नागरिकांनीही खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोना नियमावलींचे पालन केले तरच स्वत:चा व कुटुंबियांचा बचाव केला जाऊ शकतो. - डॉ. सुरेशसिंह बिसेन, मनपा आरोग्य अधिकारी, नांदेड.
नांदेडमध्ये तपासणीसाठी एकमेव केंद्र आहे. याच ठिकाणी तपासणीसाठी यावे लागते. सकाळी लवकर आले, तर कर्मचारी येत नाहीत. त्यानंतर गर्दी वाढत जाते. तपासणीची गतीही कमी असल्याने नागरिकांना आता त्याचा त्रास होत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे. - राजेश्वर वाघमारे, नांदेड
नाना-नानी पार्कमध्ये प्रवेश करण्यापासून ते कोरोना अहवाल घेण्यापर्यंत रांगेतूनच प्रवास करावा लागत आहे. यामुळे येथे आल्यावर कोरोनाची भीती आणखीच वाढली आहे. पण दुसरा पर्यायही नसल्याने आता करायचे काय, हा प्रश्न सर्व व्यापाऱ्यांना पडला आहे. तपासणी बंधनकारक केली; पण तपासणी करण्यासाठी आणखी केंद्र वाढविण्याची गरज आहे. - विश्वास अग्रवाल, व्यापारी.
कोरानाची तपासणी सर्वांनी करावी, हे चांगलेच आहे. पण ती करताना नागरिकांना आवश्यक ती सुविधा प्रशासन का उपलब्ध करून देत नसावे, हा प्रश्नच आहे. एकीकडे अहवाल असल्याशिवाय दुकान उघडायचे नाही आणि तपासणी वेळेवर, लवकर करून द्यायची नाही. त्यात कोरोनाची भीती आहेच. - कृष्णा गाजरे, नांदेड