विष्णूपुरी जलाशय १०० टक्के भरला; नांदेडला तीन दिवसांआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 07:38 PM2019-09-03T19:38:25+5:302019-09-03T19:40:52+5:30
विष्णूपुरी जलाशय तुडुंब भरल्याने टंचाईचे संकट टळले
नांदेड : मागील आठ महिन्यांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या नांदेडकरांना आता तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे़ विष्णूपुरी जलाशय १०० टक्के भरल्याने महापालिकेने शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे़ यासंदर्भात मंगळवारी अधिकृत पाणीपुरवठ्याचे नियोजन प्रसिद्ध केले जाणार आहे़ त्यानंतर तीन दिवसांआड पाणी सोडण्यात येणार आहे़ विघ्नहर्त्या बाप्पांच्या आगमनासोबतच पाण्याचे संकट दूर झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला़
मागील वर्षी अल्पपावसामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागला़ विष्णूपुरी जलाशयात उपलब्ध असलेले पाणी अवैध उपशामुळे जानेवारी, फेब्रुवारीतच कमी झाले़ त्यामुळे नांदेड शहराला मार्चपासून पाच दिवसांआड व एप्रिल, मे, जून, जुलै, आॅगस्ट महिन्यात सहा ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता़ त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या झळा पावसाळ्यातही कायम होत्या़ अर्धा पावसाळा संपला तरी विष्णूपुरी जलाशयात पुरेसा साठा उपलब्ध झाला नव्हता़
मागील तीन महिन्यांत केवळ ४५ टक्के पाऊस झाल्याने नदी- नाले, धरणे, बंधारे कोरडेच होते़ तर दुसरीकडे नांदेड शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी जलाशयात केवळ १७ दलघमी पाणी उपलब्ध झाले होते़ पावसाचे प्रमुख नक्षत्रे कोरडेच गेल्यामुळे सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते़ दरम्यान, जायकवाडी धरण पूर्ण भरल्यामुळे या पाण्याची प्रतीक्षा करण्यात येत होती़ परंतु, जायकवाडीचे पाणी विष्णूपुरी जलाशयातपर्यंत पोहोचले नाही़
जायकवाडीच्या पाण्याचा लाभ ढालेगाव व विटा बंधाऱ्यापर्यंत झाला़ दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकट गडद होत होते़ ऐन पावसाळ्यात नागरिक पाण्यासाठी भटकंती करताना दिसत होते़ आठवड्यात एक वेळेस येणाऱ्या टँकरवर पाण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती़ मागील दहा, पंधरा वर्षांत प्रथमच पाणीटंचाईचे गंभीर संकट नांदेडकरांनी अनुभवले होते़ त्यामुळे विष्णूपुरी जलाशयात कधी पाणी उपलब्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते़ अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे विष्णूपुरी भरण्याची आशा मावळली होती़ त्यामुळे विष्णूपुरी जलाशयात असलेल्या पाण्याचे काटकसरीने नियोजन केले होते़ आठ दिवसांत एक वेळेस पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्याचा संचय करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता़ मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पाण्यासाठी वैतागलेल्या नागरिकांना मोठा दिलासा दिला़ गोदावरी नदीक्षेत्रात या पावसाळ्यात प्रथमच दमदार पाऊस झाल्याने विष्णूपुरी जलाशयात पाण्याचा येवा सुरू झाला़ सोमवारी विष्णूपुरी जलाशय पूर्ण भरल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला़
पाण्याचे महत्त्व ओळखून काटकसरीने वापर करा
च्पाण्यासाठी होरपळून निघालेल्या नागरिकांना आता तीन दिवसांआड पाणी मिळणार आहे़ यासंदर्भात महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले, विष्णूपुरी जलाशय शंभर टक्के भरल्याने नांदेड शहराला आता तीन दिवसांआड पाणी सोडण्यात येणार आहे़ यासंदर्भात मंगळवारी अधिकृत घोषणा होवून या निर्णयाची अंमलबजावणी होईल़ नागरिकांनी पाण्याचे महत्त्व ओळखून यापुढे पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले़