निसार तांबोळी यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:17 AM2020-12-24T04:17:17+5:302020-12-24T04:17:17+5:30
माता मंदिराचा जीर्णोद्धार धर्माबाद - रत्नाळी येथील श्री द्रोपदी माता मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून २४ रोजी नवीन ...
माता मंदिराचा जीर्णोद्धार
धर्माबाद - रत्नाळी येथील श्री द्रोपदी माता मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून २४ रोजी नवीन मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महाप्रसादाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
पोलीसपाटील निलंबित
हदगाव - अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष ठेवल्याच्या आरोपावरून पोलीस पाटील नागनाथ मुतलवार यांना निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी दिलेल्या तक्रारीत मुतलवार हे स्थानिक राजकारणही करीत असल्याचा आरोप केला होता. उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी ही कारवाई केली.
बांबू मिशन शिबिर
उमरी - बांबूची लागवड व यातून होणारे फायदे यासंदर्भात २५ डिसेंबर रोजी सिंधी येथे मार्गदर्शन शिबिर होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.वसंतराव चव्हाण तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाशा पटेल, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, आ.राजेश पवार, उद्योजक मारोतराव कवळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग देशमुख, आरोग्य सभापती संजय बेळगे, बाजार समितीचे संचालक भगवानराव आलेगावकर, विठ्ठलराव डक, उमरीचे उपसभापती शिरीष गोरठेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हादराव ढगे, माजी शिवसेना तालुकाप्रमुख साहेबराव शिंदे आदींची उपस्थिती राहणार असल्याचे संयाेजक गोविंदराव पाटील सिंधीकर यांनी सांगितले.
वाल्मिकी मूर्तीची स्थापना
धर्मबाद - शहरातील देवीगल्ली येथे महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या मूर्तीच्या स्थापनेचा कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी अंजू बालेमवार, रमेश बोनगीरवार, संतोष तुनकेवार, राजू गोडगुलवार आदी उपस्थित होते.
गीता जयंती महोत्सव
हिमायतनगर - तालुक्यातील सरसम बुद्रूक येथे भगवद गीता जयंती महोत्सव, ज्ञानेश्वरी व भगवद गीता पारायण सोहळ्यास शनिवारी प्रारंभ झाला. २६ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. भीमाशंकर महाराज हे संगीतमय रामकथा सादर करीत आहेत. कार्यक्रमाची सांगता आ.माधवराव जवळगावकर, डॉ. आशिष मोतेवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
जनावरांची आधार नोंदणी
धर्माबाद - तालुक्यातील करखेली येथे पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत ४ हजार २०० पशूंना बिल्ले मारून आधार नोंदणी करण्यात आली. करखेली, येताळा, इळेगाव, चिकना, समराळा, बाबुळगाव, धानोरा, येवती, राजापूर, बाचेगाव, पांगरी, हसनाळी आदी गावे येतात. या गावातील १२ हजार ३०२ पैकी ४ हजार २०० पशूंना बिल्ले मारून आधार नोंदणी करण्यात आली. याकामी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विकास गडेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
पेरूवर कार्यशाळा
देगलूर - तालुक्यातील होट्टल शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने शहापूर येथे पेरू लागवड व निगा या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी डॉ.संतोष चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कंपनीचे सीईओ प्रभू वंकलवार यांनी मार्गदर्शन केले. प्रकल्प व्यवस्थापक किशोर काळे यांनी फळबागांसाठी शासनाकडून मदत येणार आहे. याचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.