उपविभागीय अधिकाऱ्यांच्या भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:15 AM2021-04-26T04:15:45+5:302021-04-26T04:15:45+5:30
वॉटर फिल्टर मशीन भेट देगलूर : तालुक्यातील खानापूर कोविड सपोर्ट ग्रुपच्या सदस्याने देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयास शुद्ध पाण्याचे वॉटर ...
वॉटर फिल्टर मशीन भेट
देगलूर : तालुक्यातील खानापूर कोविड सपोर्ट ग्रुपच्या सदस्याने देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयास शुद्ध पाण्याचे वॉटर फिल्टर भेट दिले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अमोल मुनगीलवार, योगेश खानापूरकर, गणेश भुरे, सुनील विभुते, अशोक डुकरे, राजेश एम, गंगाधर विभुते, प्रभाकर विभुते, डॉ. मलशेटवार, डॉ. वलांडे, डॉ. गायकवाड, लोखंडे आदी उपस्थित होते.
गुळवेल व हळद वाटप
मुखेड : तालुक्यातील बाऱ्हाळी येथील पतंजली योग समितीच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी गुळवेल व कच्ची हळद वाटप करण्यात आली. यावेळी डॉ. राखेवार, नरसिंग असवले, डॉ. कादरी, अमोल डंबाळ, प्रकाश वाघमारे, माधव राजेवाड, दिलीप जाधव, विनोद वाघमारे, वंदना पवार, अप्सरा शेख, रोहिणी गेडेवाड, अब्दुल शेख आदी उपस्थित होते.
बोगस बियाणांचा बंदोबस्त करा
मुखेड : मागील वर्षभरात खताच्या बॅगच्या दरात ७०० रुपयांची वाढ झाली. ही वाढ म्हणजे सरळ सरळ लूट आहे. खत कंपन्यांनी केलेली दरवाढ रद्द करावी. तसेच खत-बियाणांचा काळाबाजार होणार नाही यासाठी यंत्रणा राबवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनचे युवा जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील यांनी कृषिमंत्र्यांकडे केली आहे. मागील वर्षी पेरणीच्या अगोदर लॉकडाऊन होते. त्यामुळे खते-बियाणांमध्ये काळाबाजार झाला. शेतकऱ्यांच्या हातात बोगस बियाणे पडली. परिणामी अनेकांना दुबार पेरणी करावी लागली होती.
शिक्षकांच्या प्रश्नावर चर्चा
किनवट : महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीची राज्य कार्यकारी मंडळाची सहविचार सभा घेण्यात आली. या सभेत विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व अन्य उपस्थित होते.
नायगावला दुचाकीची चोरी
नायगाव : बळवंतनगर, नायगाव येथील शिवराज कल्याण यांची दुचाकी (क्र. एमएच २६ एक्स ४४६८) चोरट्यांनी लांबविली. नायगाव पोलिसांनी शिवराज यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांचा छापा
धर्माबाद : बोळसा शिवारात धर्माबाद पोलिसांनी छापा टाकून २०० लिटर हातभट्टीची दारू जप्त केली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. याची किंमत १० हजार रुपये किंमत आहे. पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवप्रसाद कत्ते, नल्लेवाड, जमादार जाधव, पोलीस नाईक फिरोज आदींनी ही कारवाई केली.
सोयाबीनची खरेदी
उमरी : येथील बाजारात सोयाबीनला प्रतिक्विंटल ७५०० रुपये असा दर मिळत असल्याने व्यापाऱ्यांना मोठा फायदा होत आहे. सुरुवातीला याच व्यापाऱ्यांनी ३ ते ३५०० रुपये दराने सोयाबीन खरेदी केली होती. जेव्हा शेतकऱ्यांना आर्थिक अडचण येते तेव्हा कमी दरात खरेदी केली जाते. आणि माल संपल्यानंतर त्याच मालाला भाववाढ दिली जात असल्याने व्यापाऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे.
विवाहितेची आत्महत्या
माहूर : तालुक्यातील पानोळा येथील विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याची घटना २० एप्रिल रोजी घडली. मयत अरुणा अशोक राजूरकर यांना चार मुली झाल्या. या कारणावरून तिने माहेराहून पैसे आणावेत यासाठी पती अशोक राजूरकर, जिजाबाई राजूरकर, शांताबाई गोत्रमपल्ले, सिंधूबाई हिवाळे, कांताबाई गुडापे आदी अरुणाबाईचा छळ करीत होते. या छळाला कंटाळून अरुणाबाई यांनी २० एप्रिल रोजी आत्महत्या केली.
रथोत्सव साधेपणाने साजरा
मुक्रमाबाद : येथील महादेव मंदिराचा रथोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी रथ फुलांनी सजविण्यात आला होता. कोरोनामुळे निवडक लोकांच्या उपस्थितीत महादेवाची विधिवत पूजाअर्चा व आरती करण्यात आल्याची माहिती पुजारी राचप्पा स्वामी यांनी दिली.