विठ्ठल-रुक्मिणीला उमरीच्या व्यापाऱ्याकडून एक कोटींचे सुवर्ण मुकुट; पंढरपुरात करणार अर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 04:04 PM2022-07-09T16:04:14+5:302022-07-09T16:11:59+5:30
कोरोना काळातही त्यांनी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी व आरोग्य विभागाला देणगी स्वरूपात मोठी रक्कम दिली होती.
- बी. व्ही .चव्हाण
उमरी (जिल्हा नांदेड): येथील सराफा व्यापारी व माजी नगराध्यक्ष विजयकुमार उत्तरवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीसाठी दोन किलो वजनाचा एक कोटी रुपये मूल्य असलेला सुवर्ण मुकुट अर्पण करीत आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी हा सुवर्ण मुकुट विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसाठी अर्पण करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
उमरी येथील सराफा व्यापारी व माजी नगराध्यक्ष विजय उत्तरवार यांचा प्रत्येक सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक चळवळीत नेहमीच सहभाग असतो. कोरोना काळातही त्यांनी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी व आरोग्य विभागाला देणगी स्वरूपात मोठी रक्कम दिली होती. दरम्यान , गेल्या काही दिवसापूर्वीच त्यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसाठी सुवर्ण मुकुट अर्पण करण्याचा हा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी १६८ ग्रॅम वजनाच्या ४४ कॅरेट सोन्यापासून बनविले दोन सुवर्ण मुकुट तयार करून घेतले. या दोन सुवर्ण मुकुटांची बाजार मूल्य किंमत एक कोटी रुपये एवढी आहे. खामगाव जिल्हा बुलढाणा येथील खास सुवर्ण कारागीरांकडून हे सुवर्णमुकुट त्यांनी बनवून घेतले.
पंढरपूर येथे रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी विधिवत कार्यक्रमात दोन्ही मुकुट अर्पण करण्यात येणार आहेत, अशी माहिती विजयकुमार उत्तरवार यांचे चिरंजीव डॉ. अनंत उत्तरवार यांनी दिली. सुवर्ण मुकुट अर्पण कार्यक्रमासाठी विजयकुमार हे पत्नी जयश्री, मुले ओंकार, अरविंद, अच्युत यांच्यासह पंढरपूर येथे पोहोचले आहेत. आज संध्याकाळी उत्तरवार कुटुंबीय विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करतील. त्यानंतर सदरील सुवर्ण मुकुट अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल. अशी माहिती उत्तरवार कुटुंबीयांच्यावतीने देण्यात आली.