खळबळजनक ! बोअरवेल मधून पाण्याऐवजी लाव्हारस निघाल्याने ग्रामस्थ भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 03:19 PM2019-06-07T15:19:34+5:302019-06-07T15:23:09+5:30
नांदेड जिल्हयातील जांभरून येथील घटना
नांदेड : कोरड्या बोअरवेलमधून अचानक लाव्हारस सदृश्य द्रव्य बाहेर पडल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. हा प्रकार तालुक्यातील जांभरून येथे घडला.
नांदेड - हैदराबाद महामार्गावर जांभरुन हे गाव आहे. गावातील तुकाराम देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या शेतात बोअरवेल घेतला होता. मात्र हा बोअरवेल कोरडा गेला. त्यामुळे सदर शेतकऱ्याने त्याकडे दुर्लक्ष करून बोअरवेल आहे त्या स्थितीत सोडून दिला. मात्र दोन दिवसापूर्वी या बोअरवेलमधून लाव्हारस सदृश्य द्रव्य बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले. ही माहिती समजल्यानंतर सदर बोअरवेल परिसरात ग्रामस्थांनी गर्दी केली होती. दरम्यान या प्रकाराची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली असून, नेमका कशामुळे हा प्रकार घडला हे तपासणी अंतीच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान जांभरूनचे सरपंच उत्तम किरकण यांच्या म्हणण्यानुसार चार दिवसापूर्वी सायंकाळी पाचच्या सुमारास या परिसरात वादळी पाऊस झाला. त्यावेळी सदर परिसरात वीज कोसळली होती. त्यानंतरच सदर ठिकाणाहून तप्त डांबरासारखा द्रव बाहेर पडल्याचा दावा सरपंच किरकण यांनी केला. तर जांभरूनचे पोलीस पाटील विश्वंभर पाटील म्हणाले की घटनेनंतर याची माहिती लोहा तहसिल कार्यालयाला देण्यात आली आहे. नेमके हे कशामुळे घडले ते अहवालानंतरच स्पष्ट होईल