नांदेड जिल्हा बँकेसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:17 AM2021-04-02T04:17:53+5:302021-04-02T04:17:53+5:30
जिल्हा बँकेच्या १८ संचालक पदासाठी २ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हे मतदान ...
जिल्हा बँकेच्या १८ संचालक पदासाठी २ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हे मतदान होणार असून, या मतदानासाठी जिल्ह्यात १५ केंद्रे राहणार आहेत. हिमायतनगरचे मतदान केंद्र आता हदगावला जोडण्यात आले आहे. तेथे केवळ एकच मतदार असल्याने हा बदल करण्यात आला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. तहसीलदार हे मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत, तर नायब तहसीलदार व इतर अधिकारी हे मतदान अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. जवळपास १०० ते ११० अधिकारी, कर्मचारी या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
या मतदानादरम्यान एखादा मतदार हा कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्या मतदाराला मतदानाची संधी दिली जाणार आहे. मात्र, दुपारी ३.३० ते ४ या वेळेत त्याचे मतदान त्याच केंद्रावर होणार आहे. मतमोजणी ४ एप्रिल रोजी नांदेड उपविभागीय कार्यालयात होणार आहे.
चौकट---------------------
लक्षवेधी लढती
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लक्षवेधी लढतीमध्ये लोहा तालुक्यात खा. प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या विरोधात ललिताबाई सूर्यवंशी या रिंगणात उतरल्या आहेत, तर कंधारमध्ये खासदारपुत्र प्रवीण पाटील-चिखलीकर यांच्या विरोधात माधवराव पांडागळे रिंगणात आहेत. नायगाव तालुक्यातही माजी मंत्री गंगाधर कुंटूरकर विरुद्ध माजी आ. वसंतराव चव्हाण यांच्यात सामना रंगणार आहे. उंद्रीमध्येही माजी आ. बापूसाहेब गोरठेकर यांचे चिरंजीव कैलास देशमुख गोरठेकर आणि जि. प. सदस्य मारोतराव पवळे यांचे पुत्र संदीप पवळे यांच्यात लढत होत आहे. मुखेड तालुक्यात माजी आ. हनमंत पाटील विरुद्ध गंगाधर राठोड असा थेट सामना होत आहे. दिलीप कंदकुर्ते यांचा सामना शिवराम लुटे यांच्यासमवेत होणार आहे.