वाडी बु. येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:12 AM2021-06-30T04:12:57+5:302021-06-30T04:12:57+5:30

जिल्ह्यात विस्ताराने मोठ्या असलेल्या नांदेड तालुक्यात आरोग्य यंत्रणेचे बळ कमी पडत होते. त्यामुळे महापालिका वगळता वाडी बु. व परिसरातील ...

Wadi Bu. Sanction for 100-bed sub-district hospital here | वाडी बु. येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी

वाडी बु. येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी

Next

जिल्ह्यात विस्ताराने मोठ्या असलेल्या नांदेड तालुक्यात आरोग्य यंत्रणेचे बळ कमी पडत होते. त्यामुळे महापालिका वगळता वाडी बु. व परिसरातील नागरिकांची आरोग्य सेवेसाठी धावपळ उडत होती. नागरिकांना १५ ते २० कि.मी. अंतरावरील विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालय उपचारासाठी गाठावे लागत होते. याबाबत नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून या विषयाकडे लक्ष वेधले होते. वाडी बु. येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी आरोग्य संचालनालयाकडे २४ ऑगस्ट २०२० रोजी या रुग्णालयाचा प्रस्ताव पाठवला होता. आरोग्य संचालनालयाने २६ मार्च २०२१ रोजी हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. प्रस्ताव मान्यतेसाठी आमदार कल्याणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वाडी बु. येथील उपजिल्हा रुग्णालयास विशेष बाब म्हणून मंजुरी दिली. २९ जून रोजी या रुग्णालयाच्या मंजुरीचे आदेश काढण्यात आले आहेत. लवकरच या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा अधिग्रहित केली जाणार आहे. तसेच इमारत बांधकाम व पदनिर्मितीसाठी स्वतंत्रपणे कार्यवाही केली जाणार आहे.

नांदेड तालुक्यात सात लाख ९७ हजार लोकसंख्या आहे. वाडी बु. व परिसरात दीड लाख लोकसंख्या असून, या भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. या उपजिल्हा रुग्णालयातील ९३ पदांसाठी, इमारत निर्मिती, यंत्रसामग्री, रुग्णवाहिका, औषधी व उपकरणे, कार्यालयीन खर्च, आदी बाबींसाठी ६४ कोटी ३१ लाखांचा प्रस्ताव आरोग्य विभागाने शासनाकडे पाठविला आहे.

Web Title: Wadi Bu. Sanction for 100-bed sub-district hospital here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.