थांब बेटा, परत जा..! जीवन संपविण्यासाठी आलेल्यांना गोदामाईची हाक, पुलावर लागले पत्र
By शिवराज बिचेवार | Published: April 2, 2024 03:11 PM2024-04-02T15:11:06+5:302024-04-02T15:12:48+5:30
याच पुलावरुन जीवनयात्रा संपविलेल्या मुलाच्या पालकाने आवाहन करत डकविले पत्र
नांदेड : शहरातील गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आजपर्यंत अनेकांनी जीवनयात्रा संपविली आहे. त्यामुळे गोदावरीचा पूल डेथ पॉईंट म्हणून कुप्रसिद्ध झाला आहे. यवतमाळ येथील एका मुलाने याच ठिकाणाहून आत्महत्या केल्यानंतर त्या दु:खातून सावरत पालकांनी चक्क गोदावरीच्या पुलावरच गोदामाईचे भावनिक पत्र ठिकठिकाणी लावले आहे. ‘थांब बेटा.. परत जा..!’ असे लिहिलेले एक दीर्घ पत्रक सध्या गोदावरी नदीच्या पुलावर जागोजागी दिसून येत आहेत. त्या पत्रकातून खुद्द गोदामाईच जीवनाचे महत्त्व समजावून सांगत आहे.
गोदावरी नदी ही जीवनवाहिनी आहे. परंतु आजवर अनेकांनी किरकोळ कारणावरूनही नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. महिन्याकाठी हे प्रमाण तीन ते चार एवढे आहे. मध्यंतरी पुलावर जाळी लावण्याचा विचारही त्यातून पुढे आला होता. परंतु नंतर ताे बारगळला. परंतु यवतमाळ येथील एका पालकाने गोदावरी नदीच्या पुलावर गोदामाईचे पत्रच लावले आहे. एखादी व्यक्ती आयुष्याला कंटाळून पवित्र गोदावरी नदीच्या पात्रात जलसमाधी घेण्यासाठी आल्यास त्याला परावृत्त करण्यासाठी हा प्रयत्न केलेला दिसून येतो. हे भावनिक पत्र अनेकांना खुणावत आहे. गोदावरीच्या पुलावर होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशाही भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त केल्या जात आहे.
अकाली जीवनयात्रा संपविण्यासाठी येथे येणाऱ्या नाराज व्यक्तींना धीर देण्यासाठी कुण्यातरी संवेदनशील व्यक्तीने हे पत्रक गोदावरीच्या पुलावर जागोजागी लावले आहे. या पत्रकातून स्वत: गोदावरी नदीच जीवन वाचविण्याचा संदेश देत आहे... ‘थांब बेटा... परत जा...!’ अशी आर्त हाक देऊन त्यांना जीवनयात्रा न संपवण्याची विनवणी या पत्रकातून खुद्द गोदावरीमाईने केली आहे.